नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; आरोपीला शासन केले जाईल उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

by Team Satara Today | published on : 04 May 2026


मुंबई : भोर नसरापूर येथील चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिला जीवे मारणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षाच योग्य असून, त्याला लवकरात फासावर चढवण्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. नसरापूर ग्रामपंचायत सदस्य आणि इतर ग्रामस्थांनी आमदार दिलीप लांडे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकार या घटनेला जबाबदार असलेला आरोपी भीमराव कांबळेला फासावर चढवण्याची मागणी करणारे निवेदन त्यांना दिले.

ग्रामस्थांनी सदर आरोपीने यापूर्वीही दोन वेळा असेच गुन्हे केले असून यावेळी तिसऱ्यांदा त्याने असे केले असल्याचे सांगितले. त्यामुळे अशा नराधमाला आता सोडल्यास पुन्हा तो कुणाचा तरी घास घेईल, अशी भीती गावात निर्माण झाली असल्याचे सांगितले. दोनदा शिक्षा होऊनही अल्पावधीत सुटका झाल्याने त्याची हिंमत वाढल्याने त्याने पुन्हा असे कृत्य केले. त्यामुळे या आरोपीवर कायमची कारवाई करावी अशी विनंती त्यांनी शिंदे यांना केली.

ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारून त्यांच्याशी बोलल्यानंतर या घटनेबाबत माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून तेही या घटनेबाबत अतिशय गंभीर असल्याचे सांगितले. याबाबत आम्ही दोघांनीही पोलीस अधीक्षकांना न्यायवैद्यक पुरावे, इतर सर्व पुरावे अतिशय काटेकोरपणे गोळा करण्यास सांगितले आहे. तसेच लवकरात लवकर त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच्यावर सर्व गंभीर कलमे दाखल करून तो कोणत्याही परिस्थितीत वयाचे अथवा मानसिक आजाराचे कारण काढून सुटणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचेही सांगितले.

कोणत्याही परिस्थितीत आरोपीला सोडणार नाही

या घटनेसाठी पुण्यातील निष्णात वकिलांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जाणार असून अशा प्रकारचे खटले हाताळण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे स्पष्ट केले. तसेच मी आणि मुख्यमंत्री मिळून आम्ही पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचेकडून दर दिवशी या घटनेची माहिती  घेत असून कोणत्याही परिस्थितीत आरोपीला सोडणार नाही. पीडितेच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीना विनंती करून या घटनेची दैनंदिन सुनावणी घेण्यासाठी विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्याबाबतही सरकार प्रयत्नशील असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, या घटनेनंतर मी स्वतः पीडितेच्या वडिलांशी फोनवरून बोललो असून त्यांचे सांत्वन केले आहे. या घटनेतील नराधमाला फासावर चढवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. अशा प्रवृत्तींना ठेचून काढणे आणि समाजात योग्य तो संदेश पोहचवणे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही नक्की पूर्ण करू. याबाबत योग्य ती कारवाई करणार असून आरोपीला शासन केले जाईल असे सांगून त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मसूरपुर्व भागाला सात तारखेला आरफळ कॅनॉलमधून कण्हेर धरणाचे पाणी मिळणार: आ. मनोज घोरपडे
पुढील बातमी
तीन राज्यातील भाजपच्या विजयाचा आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत कोरेगावात जल्लोष; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दणाणला

संबंधित बातम्या