राज्यात कायदा व सुव्यवस्था न राखल्याने गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - उमेश चव्हाण यांची मागणी; साताऱ्यात 20 रोजी सरकारविरुध्द मोर्चा

by Team Satara Today | published on : 04 May 2026


सातारा :  भोंदू बाबांनी राज्यात थैमान घातले आहे. कोट्यवधी रुपयांची लूट, महिलांवर अत्याचार अशी प्रकरणे उघडकीस येत असताना त्यावर ठोस उपाय योजना होत नाहीत. पोलीस दल हे सरकारचे बाहुले बनून काम करत आहे. पोलिसांनी त्यांना संविधानानुसार दिलेल्या अधिकारानुसार कर्तव्य बजावण्याची आवश्यकता असताना ते राजकीय सत्ताधार्‍यांच्या अन्यायी भूमिकेचे समर्थन करत असल्यासारखे वागत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना अपयश आले असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दलित महासंघाचे राज्य अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान, दि. 20 रोजी सरकारविरुध्द जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुण्यातील नसरापूर येथे एका चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्यात विविध ठिकाणी आंदोलने आणि निषेध मोर्चे झाले. मध्यरात्री नवले पुलावर प्रचंड जनक्षोभ उसळला होता. पोलिसांनी बळाचा वापर करत सुमारे चार ते पाच तासांनी हा पूल मोकळा केला. हा प्रकार म्हणजे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचं वाटोळं झाले आहे असाच आहे. 

जातीय व धार्मिक वाद, इतिहासाची तोडफोड करण्याचे काम महाराष्ट्रात करुन जाती जातीत, धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत संविधानात्मक जबाबदारी टाळत असल्याने राज्यात अराजकता माजली आहे. एकीकडे वाढती महागाई व नैसर्गिक संकटांनी त्रस्त असलेल्या जनतेला महाराष्ट्रात शांत, निर्भय जीवन जगणे मुश्किल झाले आहे. सदरक्षणाय खलनिग्रहाणाय हे ब्रीद असलेल्या पोलीस दलाची आता जनतेलाच भीती वाटू लागली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व जनतेला जगण्यासाठी आशादायी वातावरण निर्माण करण्यासाठी ठोस निर्णय घेवून समाजात वाढलेल्या अपप्रवृत्ती धर्म, जात न पाहता ठेचून काढायला हव्यात, अशी जनतेची मागणी आहे. 

बेरोजगारीमुळे तरुणाई व्यसनाधीन होत असल्याने कुटुंबे उध्दवस्त होत आहे. त्यातच मुली व महिलांवरील वाढते अत्याचार ही गंभीर बाब असून शिव, शाहू, फुले, आंबडेकर यांच्या राज्यातील जनता अस्वस्थ आहे. एकीकडे भरमसाठ विकास केल्याची स्वप्ने दाखवत असताना जनता जर निर्भय व शांततेच्या मार्गाने जगू शकत नसेल अशा राज्यकर्त्यांनी सत्तेवरुन पायउतार व्हायला हवी हीच भावना जनतेच्या मनात असून सातारा जिल्हा व महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने आम्ही दलित महासंघातर्फे कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यात अपयशी ठरत असलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा व त्यांच्या जागी सक्षम व्यक्तीची नियुक्ती करुन महाराष्ट्रातील समाजजीवनाला आधार द्यावा, अशी जाहीर मागणी करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पवनचक्कीमधील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा व पाटण पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई
पुढील बातमी
अवैधरित्या दारू वाहतूकप्रकरणी एकावर गुन्हा ; सातारा तालुका पोलिसांची कारवाई

संबंधित बातम्या