सातारा : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्यंत क्रूर अत्याचार व हत्येच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा निषेध करत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) महिला आघाडी, सातारा जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनामध्ये आरोपीविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा देण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच, आरोपीचा पूर्व इतिहास लक्षात घेता प्रशासनाने वेळीच योग्य ती कारवाई केली असती, तर ही दुर्दैवी घटना टळू शकली असती, असा आरोपही महिला आघाडीने केला आहे.
यासोबतच, अशा प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर सतत नजर ठेवण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात अधिक कडक आणि प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
भविष्यात अशा गंभीर घटनांमध्ये प्रशासनाची जबाबदारी स्पष्टपणे निश्चित करावी आणि कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुवर्णादेवी पाटील, प्रदेश उपाध्यक्ष समिंद्रा जाधव, शहराध्यक्षा तेजस्विनी केसकर यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.