सातारा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने वैचारिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांसाठी "शताब्दी मंथन" या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी संघाचे क्षेत्रीय (महाराष्ट्र,गुजरात आणि गोवा)प्रचार विभाग प्रमुख श्री. प्रमोद बापट व कोल्हापूर विभाग प्रचार प्रमुख श्री. विवेक मंद्रूपकर उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वाटचालीचा विस्तृत आढावा श्री. प्रमोद बापट यांनी आपल्या भाषणात घेतला. ते म्हणाले, "आपला भारत देश हा एकेकाळी जीवनातील सर्व क्षेत्रात अत्यंत समृद्ध वैभवशाली देश होता. गेल्या दोन हजार वर्षांपासून इथे परकीय आक्रमकांच्या आक्रमणामुळे येथील धर्म ,संस्कृती,समाज व्यवस्था ढासळत गेली. प्राचीन काळी अशी जेव्हा आक्रमणे झाली तेव्हा आमच्या समाजव्यवस्थेवरच्या आघातांमुळे झालेल्या जखमा शिवण्याची व्यवस्था होती "हे सांगत असताना त्यांनी "चदरिया झिनी रे झिनी " या कबीराच्या दोह्याचे उदाहरण दिले.
"पण पुढे इस्लामी आक्रमणे आणि नंतर इंग्रजांचे आक्रमण हे या देशाच्या साठी खूप त्रासदायक ठरले.आमच्या समाजाचे स्वत्व,आत्मविश्वास,आमची संस्कृती, धर्म सर्वांवर खूप आघात झाले आणि समाज एक प्रकारे न्यूनगंडात गेला."
संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली संघाची स्थापना करत असताना भारताच्या पूर्व इतिहासाचा अभ्यास करून या देशाला निस्वार्थ, सज्जन आणि सक्षम व्यक्तीच चालवू शकतात आणि अशा व्यक्ती घडवण्यासाठी काही व्यवस्था उभी केली पाहिजे असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी 'संघ शाखा' हे अनोखी कार्यपद्धती असलेली संघटना सुरू केली.
"संघाची कार्यपद्धती अशी आहे की यामध्ये सर्वजण आपापली वैयक्तिक ओळख विसरून एकत्र येऊन समाजातील विविध प्रश्न व चांगले कार्य करण्यासाठी प्रतिबद्ध होतात आणि इथेच काम करणाऱ्या प्रत्येकाचा मी पासून ते आम्ही पर्यंतचा प्रवास हा सुरू होतो"असे प्रतिपादन त्यांनी बोलताना केलं." गेल्या शंभर वर्षात अशा लाखो स्वयंसेवकांनी संघ बांधणी मधून संघाच्या प्रेरणेतून चौतीस विविध संघटना व भारताबाहेर बत्तीस देशांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम हे वाढवले आहे"..
"संघ कामाचा आता विशाल वटवृक्ष झाला आहे. समाज जीवनाच्या जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये संघाचे कार्यकर्ते आता कार्यरत असलेले दिसतात". असे त्यांनी आपल्या बोलण्यामध्ये मांडले. त्यांच्या बोलण्यानंतर उपस्थित श्रोत्यांमधील अनेक पत्रकार साहित्यिक यांनी संघ विषयातील अनेक प्रश्न विचारून संवाद साधला.
दुसऱ्या सत्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनभागवत यांनी पंच परिवर्तन म्हणजे कुटुंबप्रबोधन, स्वबोध, सामाजिक समरसता, पर्यावरण आणि नागरी शिष्टाचार या विषयात पुढील काळात काम करण्याचे आवाहन केले आहे. त्याची विस्तृत माहिती कोल्हापूर विभागाचे प्रचार विभाग प्रमुख श्री. विवेक मंद्रूपकर यांनी सर्वांसमोर ठेवली. पुढील काळामध्ये या पाचही विषयांचा समाजातील व्यक्ती, कुटुंब आणि आपल्या आप्तेष्टांमध्ये प्रचार आणि त्याची प्रत्यक्ष कृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातारा जिल्हा सहकार्यवाह संदीप आठल्ये यांनी केले. सूत्रसंचालन ॲड अविनाश सुतार यांनी केले. याप्रसंगी संघाचे प्रचार विभागाचे प्रांत मंडळ सदस्य रमेश मंत्री, कोल्हापूर विभागाचे संपर्क प्रमुख डॉ. समीर सोहनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सातारा जिल्हा कार्यवाह महेश शिवदे, अनेक वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार, साहित्यिक, युट्युब चॅनेल संचालक, मीडिया इन्फ्लुएन्सर,पॉड कास्ट चालवणारे, संस्कृत भारती या संघटनेचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.