कुमठे ग्रामस्थांचा क्रांतिकारी निर्णय : विधवांच्या जाचक प्रथांना कायमस्वरूपी मुठमाती

by Team Satara Today | published on : 03 May 2026


कोरेगाव : क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील कुमठे गावाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून समाजातील विधवांवर लादल्या जाणाऱ्या जाचक आणि अमानवी प्रथांना कायमस्वरूपी मुठमाती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. विधवा महिलांना सन्मानाने आणि समानतेने जगता यावे, यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेतला असून या निर्णयाला गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांच्या पुढाकाराने कुमठे ग्रामपंचायत आणि जयहिंद फाउंडेशन खटाव तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता किसन फडतरे, सचिव पूनम यशवंत साळुंखे आणि सभासद सुभेदार चंद्रकांत इंगळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिनी कुमठे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यक्रम पार पडला.

या वेळी अनेक दशकांपासून रूढ असलेल्या कपाळावरील कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढणे तसेच मंगल कार्यात विधवा महिलांना दूर ठेवण्याच्या प्रथांना पूर्णतः तिलांजली देण्याचा निर्धार करण्यात आला. यापुढे विधवा महिलांना ‘विधवा’ म्हणून संबोधण्याऐवजी ‘पूर्णांगी’ असे संबोधावे, तसेच सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांत त्यांना समान स्थान द्यावे, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच याबाबत सर्व महिलांनी एकत्रित येऊन सामूहिक शपथ देखील घेतली.

यासोबतच ग्रामस्थांच्या वतीने प्रत्येक घरात जाऊन विधवा महिलांचा सन्मान राखण्याचे आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

सामाजिक नावलौकिक उंचावला 

सरपंच संतोष चव्हाण यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, बदल ही काळाची गरज आहे. आपल्या माता-भगिनींना दुय्यम वागणूक देणे हे प्रगत समाजाचे लक्षण नाही. कुमठे गावाने घेतलेला हा निर्णय संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी पथदर्शक ठरेल. कुमठे ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे गावाचा सामाजिक नावलौकिक उंचावणार असून, समाज परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकल्याची भावना व्यक्त होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोरेगाव तालुक्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रभावी नियोजन; आमदार महेश शिंदे यांची माहिती
पुढील बातमी
मुलांच्या मनात बुद्धांचे सदाचार रुजवा - मुख्याध्यापिका सुनिता वाघमारे; गोडोलीत बुद्ध जयंती साजरी

संबंधित बातम्या