कोरेगाव : तालुक्यात पाणीटंचाई जाणवू नये यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे प्रभावी नियोजन करत असून, कोणत्याही गावात टंचाई निर्माण झाल्यास तातडीने उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली.
शनिवारी दुपारी प्रियांका मल्टीपर्पज हॉल येथे आमदार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक झाली. यावेळी ग्रामस्थ, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण, हणमंतराव जगदाळे, राजेश्वरी भोसले, रत्नदीप फाळके, पंचायत समिती सदस्य सुरेखाताई पाटील, प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, सहाय्यक गट विकास अधिकारी लालासाहेब गावडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जगन्नाथ कुलकर्णी, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप निकम, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रताप कोळी यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले की, कोरेगाव तालुक्यासाठी सुमारे दोन टीएमसी पाण्याची उपलब्धता यापूर्वीच आपल्यावतीने करण्यात आली असून शिल्लक पाण्याच्या योग्य नियोजनातून टंचाईला प्रभावीपणे सामोरे जाता येणार आहे. संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या इशाऱ्यानंतर तालुक्यात आधीपासूनच नियोजन सुरू करण्यात आले आहे. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनीही पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. ज्या गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता आहे, त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावेत; अशा प्रस्तावांना त्वरित मंजुरी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पती-पत्नी प्रथमच एका सार्वजनिक व्यासपीठावर
या बैठकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमदार महेश शिंदे आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे हे पती-पत्नी प्रथमच एका प्रशासकीय व्यासपीठावर एकत्र दिसले. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रियाताई शिंदे यांची ही पहिलीच संयुक्त उपस्थिती होती. बैठकीनंतर विविध गावांतील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी व्यासपीठावर गर्दी करत दोघांकडेही विकास कामांच्या अनुषंगाने मागण्या केल्या.