सातारा : महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने सातारा नगरपरिषदेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी नगराध्यक्ष मा. अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष मा. ॲड. डी. जी. बनकर यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या निर्मितीचा इतिहास आणि कामगारांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातून १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाने महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या बलिदानातून उभा राहिलेला महाराष्ट्र आज देशाच्या प्रगतीचा कणा ठरला आहे, असे प्रतिपादन करताना नगराध्यक्ष मोहिते यांनी साताऱ्याच्या ऐतिहासिक महत्त्वालाही अधोरेखित केले.
कामगार दिनाचे औचित्य साधत त्यांनी नगरपरिषदेतील सर्व कर्मचारी वर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “सफाई कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, कार्यालयीन सेवक किंवा आरोग्य विभागातील कर्मचारी — प्रत्येकजण साताऱ्याच्या उभारणीत महत्त्वाचा वाटा उचलत आहे. तुमच्या अथक परिश्रमामुळेच शहर स्वच्छ, सुंदर आणि सुस्थितीत राहते,” असे त्यांनी नमूद केले.
उन्हाळा, पावसाळा किंवा सणासुदीचे दिवस असोत, कर्मचारी वर्ग सातत्याने सेवा बजावत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. “आपण सर्व एक कुटुंब आहोत. साताऱ्याच्या विकासासाठी एकदिलाने काम करत, हुतात्म्यांच्या स्वप्नातील प्रगत आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया,” असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास आरोग्य सभापती धनंजय जांभळे, महिला व बालकल्याण सभापती मोनिका घोरपडे, उपसभापती सुजाता गिरिगोसावी, नगरसेविका आशा डागळे, अर्चना कांबळे, शांता कोळी, वैशाली राजेभोसले, रीना भणगे, जयश्री जाधव, अपर्णा बाचल, अनिता फरांदे तसेच नगरसेवक शंकर माळवदे, दिलीप म्हेत्रे, सुशांत महाजन, मुख्याधिकारी विनोद जळक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.