सातारा : महिलांमध्ये झपाट्याने वाढत असलेल्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी देशभरात ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) लसीकरण मोहिम राबवण्यात येत असून, ‘गार्डासिल’ ही प्रभावी लस मोफत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या लसीचा केवळ एकच डोस आवश्यक असल्याने ही मोहीम अधिक सोपी व व्यापक ठरणार आहे.
सातारा जिल्ह्यातही या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि. 1 मे रोजी कस्तुरबा UPHC, सातारा येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमास विविध मान्यवर व आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
समाजामध्ये HPV लसीकरणाबाबत काही प्रमाणात नकारात्मक प्रचार व अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलींच्या आरोग्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रिया शिंदे यांनी केले.
लसीबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. डॉ. सुनिल चव्हाण व डॉ. विवेक भोसले यांच्या मुलींना प्रत्यक्ष लस देऊन समाजासमोर सकारात्मक उदाहरण ठेवण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होऊन अधिकाधिक पालक आपल्या मुलींना HPV लस देण्यासाठी पुढे येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, दि. 28 फेब्रुवारी 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या राष्ट्रीय HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रात दि. 8 मार्च 2026 रोजी, महिला दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय उद्घाटन करण्यात आले.
या मोहिमेत 14 वर्षे पूर्ण व 15 वर्षे अपूर्ण अशा मुलींना लसीकरणाचा लाभ दिला जाणार आहे. तसेच मोहिमेच्या सुरुवातीपासून पुढील 90 दिवसांत 15 वर्षे पूर्ण करणाऱ्या मुलींनाही या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे 1% मुली या मोहिमेच्या लाभार्थी ठरणार असून, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना याचा मोठा फायदा होणार आहे.