मेढा : जावळी तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी मेढा पोलीस ठाण्याने धडाकेबाज कारवाई करत कुख्यात गुन्हेगार ओंकार आगलावे (रा. बिभवी, ता. जावळी, जि. सातारा) यास तब्बल ६ महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर मोठा चाप बसला असून स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
ओंकार आगलावे याच्यावर शारीरिक मारहाण, अपहरण तसेच अवैध दारू विक्रीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सातत्याने गुन्हेगारी कृत्ये करून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारला.
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अंतर्गत ही हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून, मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी, मेढा यांनी सुनावणी घेऊन अंतिम आदेश दिला.
या कारवाईसाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व अपर पोलीस अधीक्षक सुनील साळुंके यांचे मार्गदर्शन लाभले. पोलीस प्रशासनाच्या या निर्णायक पावलामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार असून इतर गुन्हेगारांनाही कडक इशारा मिळाला आहे. मेढा पोलीस ठाणे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर सातत्याने कारवाई करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.