खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासन कटिबद्ध - पालकमंत्री शंभूराज देसाई; खरीप हंगाम नियोजनाची आढावा बैठक

by Team Satara Today | published on : 01 May 2026


सातारा  :  खरीप हंगामात खते, बियाणे, निविष्ठा यांचा तुटवडा भासू नये, या दृष्टीने पुरेशी सतर्कता बाळगा. शेतकऱ्यांना खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. 

खरीप हंगाम नियोजन २०२६ चा आढावा बैठक नियोजन भवन येथे झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील,  मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजु भोसले, जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती लता कर्णे , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय शेंडे यांचे प्रमुख उपस्थिती होती. पर्जन्यमानाचा अंदाज, खतांचा उपलब्ध साठा, बियाणांचा उपलब्ध साठा, पाण्याचे होणारे आवर्तन, आवश्यक असणारे पाणी त्याचे नियोजन या बाबत चर्चा या बैठकीत झाली. 

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, बोगस खत विक्री, कमी दर्जाच्या बियाणांची विक्री, खतांसाठी लिंकिंग पद्धत जिल्ह्यात पूर्णपणे बंद झाली पाहिजे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे कोणत्याही पद्धतीने नुकसान होऊन त्यांचा हंगाम वाया जाणार नाही याची आवश्यकती सर्व खबरदारी कृषी विभागाने घ्यावी. पेरणी वाया जाऊ नये यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने पेरणी करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. खत वितरण लिंकिंग पद्धतीने केल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांच्या येत असतात, त्यासाठी भरारी पथकांनी, तपासणी पथकांनी ॲक्शन मोडवर कारवाई करावी. ज्या खतांची शेतकऱ्यांना आवश्यकता नाही ती खते त्यांना जबरदस्तीने वितरण होता कामा नये. तपासणी पथके ज्यांच्यावर कारवाई करतात त्यांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी सक्षम पुरावे सादर झाले पाहिजेत. 

जिल्ह्यात कुठे  खते अथवा कृषी निविष्ठांचा तुटवडा जाणवल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत तात्काळ पालकमंत्र्यांच्या निदर्शनाला आणा. त्यावर निश्चितपणे मार्ग काढला जाईल. तालुकास्तरावर आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली तात्काळ आढावा बैठका घेण्यात याव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

काळोली बीज गुणन केंद्र येथील बहुउद्देशीय कृषी प्रशिक्षण केंद्रात एआय (AI) टेक्नॉलॉजीचा वापर करण्याच्या दिल्या होत्या.  बारामतीला जी एआय टेक्नॉलॉजी विशेषतः उसाच्या क्षेत्रासाठी राबवलेली आहे, तिचा अभ्यास आपल्या टीमने करावा, तिथले  ज्ञान अवगत करावे. आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी चांगला पाऊस म्हणजे किमान 50 ते 60 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अन्यथा दुबार पेरणीचा धोका संभवू शकतो. यावर्षी पर्जन्यमान तुलनेने कमी राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन व्यवस्थित करावे. जास्त पाणी वापर होणारी पिके शक्यतो टाळावीत. यावेळी त्यांनी कमी पाण्यावर लागवड होणाऱ्या फळबाग क्षेत्रात वाढ करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचेही सांगितले.

जिल्ह्यात निव्वळ पेर क्षेत्र 5 लाख 34 हजार हेक्टर असून ऊसाचे सर्वसाधारण क्षेत्र 1 लाख 14 हजार हेक्टर आहे. ऊस वगळता पेरणी क्षेत्र 2 लाख 97 हजार 914 हेक्टर आहे.  खरीप हंगाम 2026 साठी 4 लाख 12 हजार 639 हेक्टर क्षेत्रावरील पेरणीसाठी 41 हजार 579 क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. तर 1 लाख 2 हजार 300 मे. टन खतांची आवश्यकता आहे. यापैकी 60 हजार मे. टन साठा उपलब्ध आहे. उर्वरित खतांसाठी नियोजन झाले आहे. खतांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये यासाठी बफर स्टॉक 3 हजार 750 मे. टन युरियाचा साठा करण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये कृषी निविष्ठेबाबत कोणतीही तक्रार असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी 7498921284 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण, खते व किटकनाशके योग्य दरात उपलब्ध व्हावे यासाठी गुणनियंत्रण निरीक्षकांना तपासणीसाठी नियुक्त करण्यात आलेले आहे. 1 एप्रिल 2026 पासून 1 हजार 488 कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 111 जणांना कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आली आहे. तर 60 जणांवर कारवाई करुन  त्यापैकी 30 परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. 10 जणांना विक्री बंदीचे आदेश देण्यात आलेले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कमी पाण्यात अधिक उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा - पालकमंत्री शंभूराज देसाई; जलव्यवस्थापन कृती पंधरवडा-2026 चा समारोप
पुढील बातमी
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन

संबंधित बातम्या