सलग सुट्ट्यांच्या सुनामीमुळे पुणे-बेंगलोर महामार्ग ओसंडला; खंबाटकी ते आनेवाडीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

by Team Satara Today | published on : 01 May 2026


सातारा : सलग आलेल्या सुट्ट्यांचे निमित्त साधून मुंबई-पुण्यातील चाकरमान्यांनी आपल्या गावांकडे धाव घेतल्याने पुणे-सातारा महामार्गासह एक्स्प्रेस-वेवर वाहनांचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कराडच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची ही 'पळती' सुट्टी वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकली असून, प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः खंबाटकी घाट आणि बोगद्याजवळ वाहनांची संख्या कमालीची वाढल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून, तासनतास एकाच जागी थांबण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.

​या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका आनेवाडी टोलनाक्यावर बसला असून, येथे टोल भरण्यासाठी वाहनांच्या कित्येक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. टोलनाक्यावरून वाहने पुढे सरकण्यास विलंब होत असल्याने त्याचा परिणाम मागील वाहतुकीवर होऊन शिरवळ, सातारा शहर, शेंद्रे, नागठाणे, काशीळ आणि थेट कराडपर्यंत ठिकठिकाणी वाहने अडकून पडली आहेत. नवीन कात्रज बोगद्यापासूनच संथ गतीने सुरू झालेला हा प्रवास सातारा जिल्ह्यात येईपर्यंत प्रवाशांचा कस काढत आहे. रणरणत्या उन्हात लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून, प्रशासनाच्या नियोजनावर सोशल मीडियातून संताप व्यक्त केला जात आहे.

​महामार्गावरील घाट रस्ते आणि अरुंद मार्गांवर वाहनांच्या झुंबडीमुळे खासगी बसेस, पर्यटक वाहने आणि अत्यावश्यक मालवाहतूक करणारी वाहनेही या कोंडीत अडकली आहेत. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असले, तरी वाहनांचा ओघ पाहता परिस्थिती नियंत्रणात येण्यास वेळ लागत आहे. आगामी दोन-तीन दिवस सुट्ट्यांचा ओघ कायम राहणार असल्याने ही कोंडी अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाने प्रवाशांना शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आणि प्रवासाचे नियोजन करताना वाढीव वेळ हाताशी ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, सध्या तरी हा महामार्ग प्रवाशांसाठी 'डोकेदुखी' ठरत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एसटी सातारा विभागातील लिपिक-टंकलेखक पदोन्नती प्रक्रिया 3 वर्षांपासून प्रलंबित; 38 पात्र कर्मचारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत
पुढील बातमी
खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत

संबंधित बातम्या