एसटी सातारा विभागातील लिपिक-टंकलेखक पदोन्नती प्रक्रिया 3 वर्षांपासून प्रलंबित; 38 पात्र कर्मचारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत

by Team Satara Today | published on : 01 May 2026


सातारा : महामंडळाच्या सातारा विभागात चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई व तत्सम पदांवरील कर्मचाऱ्यांना लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नती देण्याची प्रक्रिया गेल्या तीन वर्षांपासून रखडली आहे. 38 पात्र कर्मचारी अद्याप नियुक्तीच्या प्रतीक्षेत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

सातारा विभागाने दिनांक 1 जून 2023 रोजी लिपिक-टंकलेखक पदोन्नतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार विभागातील सर्व आगारांमधून शैक्षणिक अर्हता पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले. अर्जांची छाननी करून पात्र 75 कर्मचाऱ्यांची दिनांक 9 व 10 ऑक्टोबर 2025 रोजी विभागीय पदोन्नती समितीमार्फत कागदपत्र पडताळणी करण्यात आली.

सातारा विभागात लिपिक-टंकलेखकच्या 53 जागा रिक्त आहेत. सामायिक ज्येष्ठतेनुसार 53 कर्मचाऱ्यांची यादी प्रसारित करण्यात आली. त्यापैकी 42 कर्मचारी पूर्णपणे पात्र असून उर्वरित 11 कर्मचाऱ्यांनी रा.प. सेवेत रुजू झाल्यानंतर महामंडळाची परवानगी न घेता पदवी उत्तीर्ण केली आहे. या यादीतील केवळ 4 पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी नियुक्ती देण्यात आली. उर्वरित 38 पात्र कर्मचाऱ्यांनी विभागीय कार्यालयात वारंवार चौकशी केली असता ‘मध्यवर्ती कार्यालयाकडे मार्गदर्शन मागवले आहे, ते आल्यावर नियुक्ती देऊ’ असे उत्तर देण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही बढती प्रक्रिया 2023 मधील असून 3 वर्षे उलटूनही पूर्ण झालेली नाही. दरम्यान, एसटीच्या इतर विभागांमध्ये याच पदासाठीची बढती प्रक्रिया दोन वेळा पूर्ण झाली आहे. मात्र सातारा विभागात पहिलीच प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.

“ज्या कर्मचाऱ्यांनी सेवेत असताना शिक्षण पूर्ण केले त्यांचा विचार करण्याऐवजी, आम्ही 38 जणांनी रा.प. सेवेत येण्याआधीच शैक्षणिक अर्हता पूर्ण केली आहे. आमच्या नेमणुका तातडीने कराव्यात,” अशी मागणी पात्र कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबाबत विभाग नियंत्रक, रा.प. सातारा यांना  मध्यवर्ती  कार्यालयाकडून आदेश देऊन न्याय द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा रुग्णालयात थॅलेसेमिया मुक्ती संकल्प सप्ताह; एक ते आठ मेदरम्यान जागृती, तपासणी, प्रशिक्षण, समुपदेशन
पुढील बातमी
सलग सुट्ट्यांच्या सुनामीमुळे पुणे-बेंगलोर महामार्ग ओसंडला; खंबाटकी ते आनेवाडीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

संबंधित बातम्या