काँग्रेस कमिटी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; सहा ते सात टपऱ्या हटवल्या

by Team Satara Today | published on : 30 April 2026


सातारा : शहरातील अतिक्रमणांच्या समस्येला आळा घालण्यासाठी सातारा नगरपालिकेने गुरुवारी काँग्रेस कमिटी परिसरात विशेष मोहीम राबवत अनधिकृत टपऱ्या व हातगाड्यांवर कारवाई केली. या कारवाईमुळे सेव्हन स्टार सिनेमा परिसरातील रस्ते मोकळे झाले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या भागातील अतिक्रमणांमुळे वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीबाबत काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सुषमा राजेघोरपडे यांनी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार तातडीने कारवाई करत पालिकेने काँग्रेस कमिटीच्या भिंतीलगत उभारण्यात आलेल्या सुमारे सहा ते सात टपऱ्या हटवल्या.

शहरातील मुख्य आणि गर्दीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याने पालिकेने व्यापक मोहिमेची आखणी केली आहे. नागरिकांना सुलभ वाहतूक आणि स्वच्छ रस्ते उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे नगराध्यक्ष मोहिते यांनी स्पष्ट केले. तसेच महत्त्वाच्या चौकांसाठी स्वतंत्र आराखडे तयार करून वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दहा कर्मचाऱ्यांच्या पथकाने डंपरच्या सहाय्याने ही कारवाई केली. सुमारे दीड तास चाललेल्या या मोहिमेदरम्यान काही विक्रेते व पालिका कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ वाद निर्माण झाला. मात्र प्रशासनाने ठाम भूमिका घेत कारवाई पूर्ण केली.

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत शहरातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारच्या मोहिमा राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दोन मोटारसायकल चोर जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १३ दुचाकी जप्त, १२ गुन्हे उघड
पुढील बातमी
डबेवाडी येथून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता; सातारा तालुका पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद

संबंधित बातम्या