सातारा : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या विविध निर्णयांच्या आधारे राज्यातील पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. सन २०२५ साठी 'परिशिष्ट अ' मध्ये नमूद पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील ८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना हा मानाचा सन्मान जाहीर झाला आहे. या सन्मानचिन्हांचे वितरण आज शुक्रवार, १ मे रोजी करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यातील सन्मानित अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत — पोलीस उपनिरीक्षक रऊफ सय्यदकरीम इनामदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक इसाक मुबारक मुलाणी, गुप्तवार्ता अधिकारी नंदकिशोर दत्तात्रय कदम, पोलीस हवालदार संजय बाळासो साळुंखे, पोलीस हवालदार गजानन आप्पासाहेब तोडकर, पोलीस हवालदार राहुल बापू खाडे, पोलीस नाईक स्वप्नील चंद्रकांत शिंदे आणि पोलीस शिपाई तुषार हणमंत भोसले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखताना उल्लेखनीय कार्य करणारे तसेच राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवा पदक व शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदारांचा या सन्मानामध्ये समावेश करण्यात आला आहे. विविध प्रवर्गांत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात येत आहे.
पोलीस महासंचालकांनी सर्व सन्मानित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या सन्मानामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना अधिक प्रेरणा मिळून नागरिकांच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्य करण्यास प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.