पाचगणी : ग्रामीण भागातील मुलींचा शिक्षणाचा प्रवास सुकर व्हावा आणि दळणवळणाच्या अभावामुळे शाळा शिकण्यात अडथळा येऊ नये, या उद्देशाने इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे पिअर (मुंबई) यांच्या वतीने हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलार येथील विद्यार्थिनींना ‘सायकल बँक’ उपक्रमांतर्गत २६ सायकलींचे वाटप करण्यात आले. या मदतीमुळे दुर्गम भागातून शाळेत येणाऱ्या मुलींच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
याप्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे पिअरच्या अध्यक्षा भावना त्रिवेदी आणि कार्यक्रम सहाय्यक अधिकारी तसनीन मुन, हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा भिलारे, सचिव जतीन भिलारे, संचालिका डॉ तेजस्विनी भिलारे, महाबळेश्वर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, केंद्र प्रमुख संजय पारठे, दगडू ढेबे, चंद्रकांत जंगम, विनायक पवार, मुख्याध्यापक मुकुंद शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा भिलारे म्हणाले ग्रामीण भागातील मुले-मुली शिकल्या पाहिजेत यासाठी एनर्व्हील क्लबचे कार्य कौतुकास्पद आहे, त्यांच्या या कार्याने मुलींना शिकण्याची नवी उमेद मिळणार आहे.
हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉ तेजस्विनी भिलारे म्हणाल्या, डोंगराळ आणि ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी - विद्यार्थिनी शिक्षणासाठी भिलार येथील शाळेत येतात. अनेकदा घरापासून शाळेचे अंतर जास्त असल्याने आणि बसची सोय वेळेवर उपलब्ध नसल्याने या मुलींना पायपीट करावी लागते. हीच अडचण ओळखून इनरव्हील क्लबने पुढाकार घेत या विद्यार्थिनींना सायकली प्रदान केल्या आहेत. सायकली मिळाल्यामुळे आता या मुलींचा वेळ वाचणार असून त्या अधिक उत्साहाने शाळेत येऊ शकणार आहेत.
या कार्यक्रमादरम्यान अध्यक्षा भावना त्रिवेदी यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. "मुलींच्या शिक्षणासाठी छोटीशी मदत करताना आम्हाला आनंद होत असून, या सायकलींचा वापर करून त्यांनी आपले शैक्षणिक ध्येय गाठावे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.तस्नीन मुन यांनीही या उपक्रमाच्या नियोजनाबाबत माहिती दिली.
यावेळी सुजाता पारठे, शांताराम जाधव, विनायक बगाडे, राजू मोरे, महेश ननावरे, संतोष मालुसरे,विद्यार्थी ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या वतीने इनरव्हील क्लब पिअर ग्रुप मुंबई च्या या सामाजिक बांधिलकीबद्दल सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक मुकुंद शिंदे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता खरात यांनी तर आभार कल्पेश गायकवाड यांनी मानले
चौकट:- दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा केंद्र खिंगर,नगरपालिका शाळा क्रमांक 1 पांचगणी, हिल रेंज हायस्कूल भिलार या शाळांना मुंबई इनरव्हील क्लब मुंबई पीअर ग्रुप यांच्या वतीने 48 सायकलींचे वाटप करण्यात आले