सातारा : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कृषि विभागाने जिल्ह्यात मोठी मोहीम हाती घेतली असून अनियमितता करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या तपासणीत दोषी आढळलेल्या विक्रेत्यांपैकी ८ जणांचे खत विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
जिल्हा व तालुका पातळीवरील भरारी पथकांनी अचानक छापे टाकत विविध विक्री केंद्रांची तपासणी केली. या दरम्यान अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन उघडकीस आले. काही विक्रेत्यांकडून पीओएस (POS) यंत्रणेद्वारे व्यवहार न करता रोखीने विक्री केली जात असल्याचे आढळले, तर काही ठिकाणी साठा नोंदी आणि प्रत्यक्ष उपलब्ध खत यामध्ये तफावत दिसून आली. याशिवाय शेतकऱ्यांना पक्की बिले न देण्याचे प्रकारही निदर्शनास आले.
प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजय शेंडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना योग्य दरात व दर्जेदार खते, बियाणे उपलब्ध व्हावीत यासाठी संपूर्ण जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हा परिषद कृषि विभागाच्या नियंत्रणाखाली भरारी पथके पुढील काळातही तपासण्या सुरू ठेवणार असून खरीप हंगामात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावयाची खबरदारी
खते, बियाणे किंवा औषधे खरेदी करताना विश्वासार्ह विक्रेत्यांची निवड करावी, पक्के बिल घ्यावे आणि संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारींसाठी पंचायत समिती तसेच तालुका कृषि कार्यालयात नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून व्हॉट्सअॅपद्वारेही तक्रार नोंदवण्याची सोय उपलब्ध आहे.