सातारा : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडची उपकंपनी असलेल्या आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने (ABHFL) आपल्या देशव्यापी विस्तार योजनेचा भाग म्हणून सातारा शहरात नवीन शाखा कार्यान्वित केली आहे. या नव्या शाखेमुळे महाराष्ट्रातील कंपनीच्या शाखांची एकूण संख्या आता ३० वर पोहोचली असून, पश्चिम महाराष्ट्रातील गृहनिर्माण वित्त क्षेत्रात कंपनीने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. साताऱ्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात परवडणाऱ्या घरांची वाढती मागणी आणि विशेषतः स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींसह लघु उद्योजकांची कर्जाची गरज लक्षात घेऊन हा विस्तार करण्यात आला आहे.
साताऱ्यातील या नवीन शाखेच्या माध्यमातून पगारदार व्यक्ती, व्यावसायिक आणि उदयोन्मुख उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी परवडणारी घरे, प्राईम हाऊसिंग, बांधकाम वित्तपुरवठा आणि मालमत्तेवर कर्ज अशा विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. कंपनीच्या प्रगत डिजिटल यंत्रणेमुळे ग्राहकांना कर्ज नोंदणीपासून ते मंजुरीपर्यंतची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि जलद गतीने पूर्ण करता येणार आहे. स्थानिक पातळीवर सुलभ वित्तपुरवठा उपलब्ध करून देऊन सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे, हा या विस्तारामागचा मुख्य उद्देश आहे.
या नवीन शाखेच्या शुभारंभाचे औचित्य साधून कंपनीने सातारकरांसाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. यामध्ये ग्राहकांना 'शून्य लॉगिन फी' आणि ५० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जांना तात्काळ मंजुरी मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही विशेष ऑफर २७ एप्रिल ते ३१ मे २०२६ या कालावधीत लागू राहणार असून, यामुळे ग्राहकांना आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे. 'हॅप्पी होम लोन जर्नी' या ब्रीदवाक्यानुसार ग्राहकांचा घर घेण्याचा प्रवास सुखकर आणि त्रासमुक्त करण्यावर कंपनीने भर दिला आहे.
या विस्ताराबाबत माहिती देताना आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ पंकज गाडगीळ यांनी सांगितले की, महाराष्ट्र ही कंपनीसाठी एक अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ असून, लोकांच्या वाढत्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रादेशिक विस्तार वाढवला जात आहे. मजबूत वितरण जाळे आणि डिजिटल क्षमतेच्या जोरावर सातारकरांना अधिक चांगल्या सेवा देण्यास कंपनी कटिबद्ध आहे. या नवीन शाखेमुळे जिल्ह्यातील आर्थिक प्रवाहात अधिक सुसूत्रता येईल आणि गृहनिर्माण क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.