वाई तालुक्यातील नागेवाडीत जमिनीच्या वादातून दिराने सख्ख्या भावजयीचा केला खून; संशयितास अटक

by Team Satara Today | published on : 28 April 2026


वाई - वडिलोपार्जित जमीन विक्री करण्याच्या वादातून दिराने सख्या भावजयीचा धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना वाई तालुक्यात उघडकीस आली. नागेवाडी (ता. वाई) येथे सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याने गावासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यातील संशयितास पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.

गीताबाई चंद्रकांत यादव (वय ४२) असे मृत महिलेचे नाव असून भिकू विठ्ठल यादव (वय ६०) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मृत महिलेचा पती चंद्रकात यादव यांनी वाई पोलिसात याबाबतची फिर्याद दिली आहे. नागेवाडी येथे चंद्रकांत यादव हे पत्नीसह राहत होते. त्यांच्याशेजारी मोठा भाऊ भिकू रहात होता. त्या दोघांची तीन एकर वडिलोपार्जित जमीन आहे. सदर जमिनीचे चांगले पैसे येतील. त्यामुळे ती विकून टाकू असा तगादा भिकू याने लावला होता. परंतु जमीन विकण्यास आमचा विरोध होता. त्यावरून नेहमी घरात वाद आणि भांडणे होत असत.

तुझ्या हिश्याची जमीन विकायची असेल तर विकून टाक परंतु मी जिवंत असेपर्यंत आमची जमीन विकायची नाही, असे पत्नी गीताबाई हिने त्याला बजावले होते. आज सकाळी आपण शेळ्या चारण्यासाठी घराबाहेर पडलो. त्यानंतर नऊ वाजता घरातून पत्नीचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे मी आणि शेजारी राहणारे लोक पळत घरी आलो. त्यावेळी पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

मोठा भाऊ भिकू हा शिवीगाळ करीत धारधार शस्त्राने तिच्यावर वार करीत असताना पहिले. आम्हाला बघून तो पळून गेला. त्यानंतर सदर प्रकाराची माहिती पोलिस पाटील दीपक बनसोडे यांना दिली. घटनेची माहिती मिळताच वाई पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभाग प्रमुख उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांनी वरिष्ठांना घटनेची माहिती कळवून पथकातील सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी पाठलाग करून वाई-पाचगणी रस्त्यावरील १६ नंबर बसथांब्यावर सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. आणि मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. संशयित भिकू यादव याने ९ जानेवारी १९९६ रोजी जमिनीच्या वादातून सावत्र भाऊ शंकर विठ्ठल यादव याचा खून केला होता.

त्याबाबतचा गुन्हा पाचगणी पोलीस ठाण्यात दाखल असून सध्या तो जामीनावर बाहेर आला होता अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली. या गुन्ह्याची नोंद झाली असून पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुधीर वाळुंज पुढील तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मलकापूर येथे फ्लॅटमध्ये घरफोडी करून सुमारे साडेसहा लाखांचे दागिने लंपास

संबंधित बातम्या