सातारा : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार सातारा जिल्ह्यात १ मे २०२६ पासून डिजिटल जनगणना मोहिमेला प्रारंभ होणार आहे. २०२७ साली होणारी ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार असून, जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपात ही प्रक्रिया राबविली जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी जनगणना नोडल अधिकारी नागेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी वर्षाताई पाटोळे यांची उपस्थिती होती. जनगणना कामासाठी जिल्ह्यात एकूण ५,४५९ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक प्रगणकाला सुमारे २०० घरांची जबाबदारी देण्यात आली आहे.
जनगणनेचा पहिला टप्पा १ मे ते १५ मे या कालावधीत होणार असून, या दरम्यान नागरिकांना स्वयं-नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. नागरिकांनी https://se.census.gov.in� या संकेतस्थळावर जाऊन ३३ प्रश्नांची माहिती भरायची आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळणारा युनिक कोड पुढील टप्प्यात प्रगणकाला देणे आवश्यक असेल.
दुसऱ्या टप्प्यात १६ मे ते १४ जून या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करतील. स्वयं-नोंदणी केलेल्या नागरिकांनी केवळ कोड देऊन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
या जनगणनेत नागरिकांची वैयक्तिक माहिती, कुटुंब रचना, घराचा प्रकार, सदस्यांची संख्या तसेच घरातील उपलब्ध सुविधा यांचा तपशील गोळा करण्यात येणार आहे. ही माहिती केवळ सांख्यिकीय हेतूसाठी वापरली जाणार असून गोपनीयतेची पूर्ण हमी देण्यात आली आहे.
दरम्यान, तालुका स्तरावर अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार आहे. भारतात जनगणनेची परंपरा १८७२ पासून सुरू असून यंदाची जनगणना स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची सोळावी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी ठरणार आहे.