खरीप २०२६ साठी साताऱ्यात खतांचा मुबलक साठा; टंचाईची शक्यता नाही - कृषि विकास अधिकारी गजानन ननावरे

by Team Satara Today | published on : 27 April 2026


सातारा  :  आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची टंचाई भासणार नाही, अशी खात्री कृषि विकास अधिकारी गजानन ननावरे यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात सध्या युरिया, डीएपी, एमओपी, सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) तसेच संयुक्त खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. मार्च २०२६ अखेर जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्रांमध्ये मिळून एकूण ५७,९९० मेट्रिक टन खतसाठा विक्रीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये युरिया १२,०७८ मे. टन, डीएपी ६,१९० मे. टन, एमओपी ३,७९१ मे. टन, सुपर फॉस्फेट ८,९४८ मे. टन आणि संयुक्त खते २६,९८३ मे. टन इतका साठा आहे.

याशिवाय, खरीप हंगामासाठी शासनाकडून सातारा जिल्ह्यासाठी एकूण १,०२,३०० मेट्रिक टन खतांचा पुरवठा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये युरिया ३८,२०० मे. टन, डीएपी ९,८०० मे. टन, एमओपी ४,२०० मे. टन, सुपर फॉस्फेट ११,८०० मे. टन आणि संयुक्त खते ३८,३०० मे. टन यांचा समावेश आहे. त्यामुळे हंगामभर खतांचा पुरवठा सुरळीत राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, खतांचे वितरण सुरळीत करण्यासाठी सर्व संबंधित खत कंपन्यांना निर्देश देण्यात आले असून कोणत्याही ठिकाणी अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. कृषि विभागाने शेतकऱ्यांना एकाच प्रकारच्या खतावर अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. माती परीक्षण करून जमिनीच्या गरजेनुसार खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल, असेही सांगण्यात आले.

तसेच जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्रांची नियमित तपासणी सुरू असून खतांची विक्री रास्त दरातच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जास्त दराने विक्री, अनधिकृत साठेबाजी, खतांचे लिकिंग किंवा औद्योगिक वापरासाठी वळवणे आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषि विभागाने दिला आहे. खतांचा मुबलक साठा आणि प्रशासनाची काटेकोर व्यवस्था यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी निर्धास्त राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरू; अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १५ मे २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
पुढील बातमी
सातारा-कराड येथील सैनिकी वसतिगृहांत प्रवेश प्रक्रिया सुरू - जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल हंगे

संबंधित बातम्या