सातारा : दिग्विजय प्रतिष्ठान, पुणे या संस्थेमार्फत ‘इक्वेस्ट्रियन हॉर्स रायडिंग’ प्रशिक्षणाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या शिवचरित्र प्रसार अश्वमोहीम अंतर्गत सहभागी अश्वरोहकांचे आज राजधानी सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे उत्साहात स्वागत करण्यात आले.
राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले (आईसाहेब) यांच्या शुभहस्ते झालेल्या या स्वागत सोहळ्यात सहभागी युवक-युवतींचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील २५ किल्ल्यांना अश्वारोहण करत भेट देण्याचा संकल्प या मोहिमेत करण्यात आला असून, शिवचरित्राचा प्रसार आणि युवकांमध्ये इतिहासाची प्रेरणा जागविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
यावेळी आईसाहेबांनी मोहिमेत सहभागी मुलामुलींचे विशेष कौतुक करत त्यांच्या धाडसी आणि प्रेरणादायी उपक्रमासाठी शुभाशीर्वाद दिले. तसेच मोहिमेचे नियोजन करणारे श्री. गणेश पुरंदरे, श्री. आशिष जाधव, श्री. शशिकांत थोरात, श्री. अनिकेत वाघोदे, श्री. सुरज मुरकुटे व श्री. सुरज नलावडे यांचेही अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर, सातारा जिल्हा भाजपा लोकसभा संयोजक श्री. सुनिल काटकर, सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्री. दत्तात्रय बनकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. चिन्मय कुलकर्णी, सातारा नगरपालिका पक्षप्रतोद श्री. निशांत पाटील, नियोजन सभापती श्री. अशोक शेडगे, महिला व बालकल्याण सभापती सौ. मोनिका घोरपडे, नगरसेवक श्री. शंकर माळवदे, श्री. पंकज चव्हाण, नगरसेविका सौ. जयश्री जाधव, सौ. हेमलता भोसले, सौ. आशा पंडित, सौ. अपर्णा बाचल, सौ. आशा डगळे, युवा नेते श्री. बाळासाहेब खरात, श्री. रोहित सावंत, श्री. राजेंद्र बर्गे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिवचरित्राचा प्रसार करत युवकांमध्ये इतिहासाची जाण, स्वराज्याची प्रेरणा आणि संस्कार रुजविणारा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अशा मोहिमांमुळे स्वराज्याच्या परंपरेची जपणूक अधिक बळकट होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.