पारगावजवळ मालट्रक उलटल्याने चालक किरकोळ जखमी; शुक्रवारी सुमारे चार तास वाहतूक खोळंबली

by Team Satara Today | published on : 25 April 2026


खंडाळा : पुणे-बंगळूर महामार्गवरील पारगावजवळ मालट्रक उलटल्याने शुक्रवारी पहाटेपासून सुमारे चार तास वाहतूक खोळंबली. या अपघातात ट्रकचे तसेच मालाचे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.

पहाटे साडेपाचच्या सुमारास पुण्याकडून साताऱ्याकडे जाणारा मालट्रक पारगाव बसस्थानकाजवळ आला असता, उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक सेवा रस्त्यावर वळवण्यात आली होती. याच वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यातच पलटी झाला. अपघातामुळे काही काळ एकाच बाजूने वाहतूक सुरू ठेवावी लागल्याने मोठी कोंडी निर्माण झाली. सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

स्थानिकांसह प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. महामार्ग पोलीस व खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला ट्रक बाजूला काढला. त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. दरम्यान, याच ठिकाणी काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारचा अपघात झाला होता. त्यामुळे या वळणावर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गोकूळ प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीचा निरोप समारंभ उत्साहात
पुढील बातमी
वरुड येथे लांडग्याच्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार; परिसरात भीतीचे वातावरण

संबंधित बातम्या