सातारा : कोडोली परिसरात बहिणीच्या घरातील रोख रक्कम व चांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बहिणीने स्वत:च्या भावाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून दि. २३ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली. संशयित आरोपीने फिर्यादीच्या बॅगेतून घराची चावी चोरून घेत घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील ५ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सुमारे १० हजार रुपये किमतीचे चांदीचे पैजण, लहान पैजण, बांगड्या, वाळे व कानातले असा एकूण १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
याप्रकरणी अश्विनी तात्यासो देशमुख (वय २८, व्यवसाय - खाजगी नोकरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्या कोडोली येथील गणेश हॉस्पिटलजवळ एका घरात भाड्याने राहत आहेत. संशयित आरोपी समाधान तात्याबा इंगळे (रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा) याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलीस हवालदार पवार हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.