सातारा : कोंडवे (ता. सातारा) येथे भाडेकरू म्हणून राहणाऱ्या व्यक्तीने घरमालक व त्यांच्या नातेवाईकांचा विश्वास संपादन करून तब्बल ४ लाख २७ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ नोव्हेंबर २०२५ ते दि. १३ मार्च २०२६ या कालावधीत ही घटना घडली. संशयित आरोपी सागर शर्मा ऊर्फ केदारनाथ सागर शर्मा हा फिर्यादी यांच्या फ्लॅटमध्ये भाडेकरू म्हणून राहत होता. त्याने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांचा तसेच नातेवाईकांचा विश्वास संपादन केला.
यानंतर विविध कारणे सांगून आरोपीने अनेकांकडून पैसे उकळले. यामध्ये विजय कांबळे यांच्याकडून गाडी खरेदी, घरभाडे व रेल्वे तिकीट या कारणांसाठी १ लाख ७६ हजार ३०० रुपये, अरुण साळुंखे यांच्याकडून १ लाख १० हजार रुपये, विवेक मिलिंद गंभरे यांच्याकडून ५० हजार रुपये, प्रविण सदाशिव कांबळे यांच्याकडून १० हजार रुपये तसेच विहार गायकवाड यांच्याकडून ८१ हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. एकूण ४ लाख २७ हजार ३०० रुपये घेतल्यानंतर संशयित आरोपी पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी विजय सदाशिव कांबळे (वय ४२, रा. वृंदावन पोलीस टाऊनशिप, सातारा, मूळ रा. आगलावेवाडी, ता. जावळी) यांनी फिर्याद दिली आहे.
संशयित आरोपी सागर शर्मा ऊर्फ केदारनाथ सागर शर्मा, (रा. इंदिरानगर कॉलनी, सीताफळमंडी, वारसीगुडा, सिकंदराबाद, हैदराबाद, तेलंगणा) याच्याविरुद्ध सातारा तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार घोरपडे अधिक तपास करत आहेत.