सातारा : सातारा शहरात एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून तब्बल ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून जीवन बापू जावळे (वय ६८, रा. वर्ये, ता. जि. सातारा) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आय.डी.बी.आय. बँक, पोवई नाका, सातारा येथील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे एक व बाजूला एक असे दोन अनोळखी उभे होते. यातील एकाने फिर्यादीचा एटीएम पिन नंबर पाठीमागून पाहिला, तर दुसऱ्या इसमाने हातचलाखीने फिर्यादीचे एटीएम कार्ड बदलून त्यांना बँक ऑफ बडोदाचे दुसरे कार्ड दिले. त्यानंतर दि. १८ रोजी सकाळी ६.४४ वाजण्याच्या सुमारास तामजाईनगर, करंजे तर्फ सातारा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून फिर्यादीच्या खात्यातून एकूण ४८ हजार रुपये काढण्यात आले.
त्यानंतर श्री. वर्ये यांची आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार कदम करीत आहेत.