सातारा : खटाव तालुक्यातील १३ वर्षीय आराध्या खटावकरने कोराम मॉल, ठाणे येथे नुकत्याच पार पडलेल्या “द पिंक पेजंट ११.११ – वर्ल्ड रेकॉर्ड अवॉर्ड २०२६” या भव्य मॉडेलिंग शोमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत प्रथम क्रमांक मिळवला. देशभरातील तब्बल ११०० अव्वल भारतीय मॉडेल्सच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत तिची कामगिरी विशेष ठरली.
आराध्याने “देवी आई महालक्ष्मी” या संकल्पनेवर आधारित सादरीकरण करत परीक्षकांची मने जिंकली. तिच्या सर्जनशील आणि प्रभावी प्रस्तुतीमुळे तिला “बेस्ट क्रिएटिव्ह डिझायनर अवॉर्ड” देखील प्रदान करण्यात आला.
ठाण्यातील कोराम मॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या शोमध्ये विविध थीम्सवर सादरीकरणे झाली. मात्र, आराध्याच्या सादरीकरणाने विशेष लक्ष वेधले आणि तिने प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले.
या स्पर्धेत आराध्याचा सहभाग Mrs. सोनल म्हात्रे (करुणाम फॅशन) यांच्या मार्गदर्शनाखाली झाला होता. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाले, असे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.
आराध्याच्या या यशामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.