साताऱ्यात देशी पिस्टलसह तरुण जेरबंद; शाहुपुरी पोलिसांची धडक कारवाई, साडे ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 25 April 2026


सातारा : शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई करत विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या हर्षद सुनील भोसले (वय २०, रा. आझादनगर, मोळाचा ओढा, सातारा)  या  तरुणाला जेरबंद केले आहे. आरोपीकडून देशी बनावटीची पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोळाचा ओढा परिसरातील राजपुरोहित दुकानासमोर एक इसम पिस्टलसारखे अग्नीशस्त्र घेऊन उभा असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक कुमार ढेरे व त्यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.

पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. झडतीदरम्यान त्याच्याकडून देशी बनावटीची पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक कुमार ढेरे व त्यांच्या पथकाने केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
केरळच्या वाळूत दडलंय भारताचं भाग्य: ५०० वर्षांच्या ऊर्जेचा महामार्ग
पुढील बातमी
साताऱ्यात ‘शिवचरित्र प्रसार अश्वमोहीम’चे आज आगमन; जलमंदिर पॅलेस येथे होणार स्वागत कार्यक्रम

संबंधित बातम्या