नूतन एसपी ॲक्शन मोडवर; पदभार स्वीकारताच जुगार अड्डे उद्ध्वस्त, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका

by Team Satara Today | published on : 25 April 2026


सातारा:  जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पदभार स्वीकारल्यापासून पोलीस दलाने आपली कार्यक्षमता दाखवण्यास सुरुवात केली आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाने जिल्हाभरात अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम उघडली असून, सातारा शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून पोलिसांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

​पोलीस अधीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सातारा शहर आणि परिसरात ठिकठिकाणी छापे टाकले. सातारा बसस्थानकासमोरील बाजार समितीच्या आवारात भिंतीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगारावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई करून संतोष जनार्दन शेळके, सुनील नारायण अवघडे आणि सोमनाथ चोरगे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम व साहित्य जप्त करण्यात आले आहे. शहर पोलिसांनी सदरबझारमधील भीमाबाई आंबेडकरनगर आणि गुरुवार परज भागातही अशाच प्रकारे छापे टाकून अशपाक गुलाब शेख, तौसिफ मज्जिद शेख आणि मनोज संपतराव माने यांना पकडले.

​तालुका पोलिसांनी परळी आणि जकातवाडी परिसरात केलेल्या कारवाईत मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे. परळी येथे झालेल्या कारवाईत प्रतिक शंकर जाधव व सोमनाथ भानुदास मनवे यांच्याकडून आयफोन, लॅपटॉप, एलईडी टीव्ही आणि दुचाकी असा सुमारे १ लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला, तर जकातवाडीत अभिजित चौगुले व गणेश कुऱ्हाडे यांच्याकडून संगणक संच व दुचाकीसह ७८ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. नागेवाडी हद्दीतही निळकंठ सावंत याच्यावर कारवाई करण्यात आली.

​अवैध धंद्यांप्रमाणेच शहरातील विस्कळीत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखाही रस्त्यावर उतरली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी कर्कश हॉर्न वाजवून शांतता भंग करणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांच्या पथकाने मोती चौक परिसरात कडक कारवाई केली. अचानक सुरू झालेल्या या वाहन तपासणीमुळे अनेकांनी आपले मार्ग बदलले, तर काहींना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. नूतन पोलीस अधीक्षकांच्या या वेगवान हालचालींमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाचा हा कडक पवित्रा यापुढेही असाच कायम राहील, असे संकेत मिळत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात भव्य मोर्चा; जिल्हा प्रशासनाला १५ दिवसांचा 'अल्टीमेटम'
पुढील बातमी
केरळच्या वाळूत दडलंय भारताचं भाग्य: ५०० वर्षांच्या ऊर्जेचा महामार्ग

संबंधित बातम्या