डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती

तोडग्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश

by Team Satara Today | published on : 25 April 2026


सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक आठवणींशी जोडले गेलेल्या ‘आमने बंगला’ परिसरात स्मारक उभारण्याच्या प्रक्रियेला आता खऱ्या अर्थाने वेग येण्याची चिन्हे आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर सकारात्मक तोडगा काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून, संबंधित घटकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

​राज्य शासनाने आमने बंगला या वास्तूला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केल्याने या जागेचे ऐतिहासिक महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य या ठिकाणी राहिले असल्याने, या ऐतिहासिक वास्तूमध्ये भव्य स्मारक उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या विशेष बैठकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वस्तुस्थितीचा आढावा घेतला. स्मारक उभारणी ही जनभावना असली तरी ती पूर्ण करताना आमने कुटुंबाचे हक्क अबाधित ठेवून त्यांना बाजारभावानुसार न्याय्य नुकसानभरपाई देण्यावर त्यांनी भर दिला आहे. तसेच, या प्रकरणातील गुंतागुंत सोडवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया थांबवून सामोपचाराने मार्ग काढणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

​भूसंपादनाच्या तांत्रिक प्रक्रियेबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले की, या प्रक्रियेदरम्यान आमने कुटुंबाने न्यायालयात धाव घेतली असून सध्या उच्च आणि जिल्हा न्यायालयात ही प्रकरणे प्रलंबित आहेत. मात्र, या वास्तूचा राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा लक्षात घेऊन आणि न्यायालयीन निर्णयाचा सन्मान करून योग्य तो पर्याय शोधण्याचे काम प्रशासन स्तरावर सुरू आहे. दरम्यान, आमने कुटुंबानेही या वादात लवचिक भूमिका घेण्याची तयारी दर्शवली असून, बाजारभावानुसार मोबदला आणि पर्यायी जमीन उपलब्ध झाल्यास न्यायालयीन लढा मागे घेण्याचे सकारात्मक संकेत दिले आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सरकारी वकील यांच्यात झालेल्या या सविस्तर चर्चेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न आता मार्गी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रतापगड नजीक भीषण अपघात; अंबेनळी घाटात ३०० फूट दरीत कोसळून वाईतील दाम्पत्याचा मृत्यू
पुढील बातमी
मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात भव्य मोर्चा; जिल्हा प्रशासनाला १५ दिवसांचा 'अल्टीमेटम'

संबंधित बातम्या