सातारा: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६ च्या स्वागतासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. पालखी मार्गावरील व्यवस्था चोख आणि नियोजनबद्ध ठेवण्यासाठी जिल्हा परिषद सातारा येथे गुरुवारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात ही बैठक संपन्न झाली, ज्यामध्ये वारीच्या तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला.
या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, प्रज्ञा माने-भोसले यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने पालखी मार्गावरील मुक्कामाची गावे आणि विसाव्याच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतेसाठी तात्पुरती शौचालये, चोख आरोग्य सुविधा आणि रस्त्यांची तातडीने दुरुस्ती या विषयांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. अपूर्ण असलेली विकासकामे पावसाळ्यापूर्वी आणि पालखी आगमनापूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
प्रशासकीय यंत्रणेतील आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम आणि महिला व बालकल्याण विभागासह स्वच्छ भारत मिशनच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या तयारीचे सादरीकरण बैठकीत केले. वारी दरम्यान वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी परस्परांशी समन्वय राखून काम करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. आषाढी वारी हा केवळ एक धार्मिक सोहळा नसून ती प्रशासनाची नैतिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत, सर्व यंत्रणांनी सेवाभावी वृत्तीने सज्ज राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.