सातारा : सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासाला मोठी गती देणारा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सातारा तालुक्यातील नागेवाडी येथील महसूल विभागाची सुमारे ४२.५५ हेक्टर (साधारण १०६ एकर) जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) वर्ग करण्याला शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे सातारकरांचे गेल्या अनेक वर्षांचे आयटी पार्कचे स्वप्न आता सत्यात उतरणार असून, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या निर्णयाचे सातारकरांच्या वतीने स्वागत करत राज्य मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देताना खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले की, ऐतिहासिक सातारा जिल्हा आता विकसनशीलतेकडून पूर्ण विकासाकडे वेगाने झेपावत आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके विकासापासून दुर्लक्षित राहिलेला हा जिल्हा गेल्या ३० वर्षांत विविध क्षेत्रांत आपली मोहोर उमटवत आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सातारने भरारी घ्यावी, स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण व्हावा आणि जिल्ह्याच्या अर्थचक्राला गती मिळावी, यासाठी सातारा येथे आयटी पार्क उभारण्याचे आमचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. या प्रकल्पासाठी आम्ही आमची लिंब येथील खासगी जागा देखील देण्याची तयारी दर्शवली होती, मात्र आता शासनाने महसूल विभागाची हक्काची जागा उपलब्ध करून दिल्याने सातारकरांसाठी प्रगतीची नवीन कपाटे उघडली गेली आहेत.
सध्याचे युग हे डिजिटल क्रांतीचे आहे. मात्र, साताऱ्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील आयटी क्षेत्रातील बुद्धिमत्ता रोजगारासाठी पुणे-मुंबई किंवा परदेशाकडे धाव घेत आहे. यामुळे मुले बाहेर आणि पालक साताऱ्यात अशी विदारक स्थिती अनेक कुटुंबांमध्ये पाहायला मिळते. आता नागेवाडी येथे आयटी पार्क साकारणार असल्याने तरुणांना आपल्या जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य जपले जाऊन प्रत्येक कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
साताऱ्याच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेताना खासदार उदयनराजे यांनी नमूद केले की, यापूर्वीच जिल्ह्यात छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. एमआयडीसीमधील शासकीय दूध डेअरीच्या जागेत कामगारांसाठी ईएसआय हॉस्पिटल लवकरच कार्यान्वित होत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे उपकेंद्र, प्रस्तावित विमानतळ आणि जिल्हा कारागृहाचे स्थलांतर यांसारखे मोठे प्रकल्प मार्गी लागत आहेत. सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून गावागावांत विकासकामे सुरू असून, येत्या काही वर्षांत ऐतिहासिक सातारा जिल्हा एक 'सुसंपन्न आणि विकसित जिल्हा' म्हणून जागतिक नकाशावर ओळखला जाईल, असेही त्यांनी शेवटी नमुद केले.