सातारा : बजाज फायनान्स कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी मुदत मागूनही महिलेला वारंवार फोन करून दमदाटी करणाऱ्या रिकव्हरी एजंटवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुस्कान आलिशान आतार (वय २५, रा. कल्पना हाउसिंग सोसायटी, शाहूपुरी) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी सुरज रामचंद्र जाधव या रिकव्हरी एजंटवर कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुस्कान आतार यांनी बजाज फायनान्सकडून एक लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते. या कर्जाचा चालू महिन्याचा ६ हजार २६० रुपयांचा हप्ता काही कौटुंबिक आणि आर्थिक अडचणींमुळे चुकला होता. या थकबाकीबाबत फायनान्स कंपनीचा रिकव्हरी एजंट सुरज जाधव याने मुस्कान यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपली तब्येत ठीक नसल्याचे आणि सध्या हातात पैसे नसल्याचे सांगितले. पैसे उपलब्ध होताच तातडीने हप्ता भरू, अशी विनंतीही त्यांनी केली होती.
मात्र, संबंधित एजंटने या विनंतीकडे दुर्लक्ष करत मुस्कान यांना वारंवार फोन करून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. केवळ फोनवर न थांबता त्याने अर्वाच्य भाषेत दमदाटी करत हप्ता भरण्यासाठी दबाव टाकला. या जाचाला कंटाळून अखेर मुस्कान आतार यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे गाठून संबंधित एजंटविरोधात तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरज रामचंद्र जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढेरे करत आहेत. कर्जाच्या वसुलीसाठी एजंटकडून होणाऱ्या अशा दहशतीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.