सातारा : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत अंमलबजावणीतील विलंब आणि आकडेवारीतील संदिग्धतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. महिलांच्या प्रतिनिधित्वाबाबत भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसने सरकारकडून या प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी केली आहे. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार अभय छाजेड यांनी ही भूमिका मांडली. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुषमा राजेघोरपडे, राजेंद्र शेलार, रजनी पवार यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अभय छाजेड म्हणाले की, लोकसभेच्या विद्यमान ५४३ जागांमध्येच महिला आरक्षण तातडीने लागू करावे, ही काँग्रेसची ठाम भूमिका आहे. मात्र, केंद्र सरकारकडून '८५०' हा आकडा नेमका कशाच्या आधारे पुढे आणला जात आहे, याचे स्पष्टीकरण सरकारने जनतेला देणे आवश्यक आहे. महिला आरक्षणासाठी काँग्रेसने सातत्याने पाठपुरावा केला असून राहुल गांधी यांनीही यासाठी मोठा संघर्ष केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून संसदेपर्यंत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यात काँग्रेसची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
सन २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असले, तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी २०२९ नंतर करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या विलंबावर बोट ठेवत छाजेड यांनी शंका व्यक्त केली. जनगणना प्रक्रियेचा आधार देऊन आरक्षणाची अंमलबजावणी लांबणीवर टाकली जात असून, ही प्रक्रिया खरोखरच वेळेत पूर्ण होईल का, याबाबत मोठी अनिश्चितता असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजप सरकारवर टीका करताना छाजेड यांनी महिलांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याचा आरोप केला. देशातील वाढती महागाई, आर्थिक अडचणी आणि सरकारच्या विविध धोरणांचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. तसेच शेती आणि कामगार क्षेत्रातील निर्णयही घाईघाईने घेतले जात असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेस पक्ष महिलांच्या हक्कांसाठी पूर्णपणे कटिबद्ध असून, महिला आरक्षण हा केवळ राजकीय मुद्दा नसून तो सामाजिक न्यायाचा महत्त्वाचा विषय असल्याचे त्यांनी शेवटी अधोरेखित केले.