सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध धरण प्रकल्पग्रस्तांचा लढा दुसऱ्या दिवशीही अधिक तीव्रतेने सुरू राहिला असून, मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक होऊन ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलक प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला डॉ. भारत पाटणकर यांच्यासह विविध प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या चर्चेदरम्यान जिल्हा पातळीवर सोडवता येणाऱ्या प्रश्नांवर तातडीने विभागनिहाय बैठका घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. मात्र, कब्जेहक्क रक्कम व घरबांधणी अनुदानासारखे मुद्दे राज्यस्तरीय धोरणाशी संबंधित असल्याने, संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या बैठकीची वेळ लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनींसाठी बंद पाईपद्वारे सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सकारात्मक असल्याचे प्रशासनाने मान्य केले असून, पाटबंधारे विभागासोबत समन्वय साधून हा प्रश्न मार्गी लावण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच पुनर्वसित गावठाणांचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले असून, येत्या काही महिन्यांत प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. तथापि, केवळ आश्वासनांवर समाधान न मानता प्रत्यक्ष निर्णय आणि अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला आहे. उरमोडी, तारळी, उत्तरमांड आणि वांग धरण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.