शिरवळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शिरवळ (ता. खंडाळा) येथे बेकायदेशीर हातभट्टी दारूच्या वाहतुकीवर धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई २० एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली असून, या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिरवळ परिसरात सापळा रचण्यात आला होता. यावेळी संशयितरित्या जात असलेल्या मारुती सुझुकी कंपनीच्या वॅगनआर कारची (क्रमांक एमएच-२० एजी-१३६३) तपासणी केली असता, त्यामध्ये ३५ लिटर क्षमतेच्या १२ कॅनमध्ये भरलेली एकूण ४२० लिटर हातभट्टी दारू मिळून आली. पथकाने ही दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण ४ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला आहे.
या प्रकरणी विकेश मानिंग कुंभार (वय २७, रा. भोळी, ता. खंडाळा, सध्या रा. सांगवी, ता. खंडाळा) या संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ (अ) (ई) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील, जवान सागर आवळे, अजित रसाळ, आबासाहेब जानकर, अरुण जाधव आणि बाळासो पांडुरंग यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. जिल्ह्यात कुठेही बनावट किंवा हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री अथवा वाहतूक होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.