हिशोब चुकवणाऱ्यांना सोडणार नाही ; सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणावरून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना घणाघाती इशारा

by Team Satara Today | published on : 20 April 2026


सातारा: सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत घडलेले राजकारण हे अत्यंत हीन पातळीचे असून, ही यशवंत विचारांची भूमी अशा प्रवृत्तींना कधीही स्वीकारणार नाही, अशा शब्दांत शिवसेना मुख्य नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर तोफ डागली. मी स्वभावाने रोखठोक असून हिशोब नेहमी चोख ठेवतो, त्यामुळे माझ्या आडव्या येणाऱ्यांना सोडणार नाही, असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला. साताऱ्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर आयोजित शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते.

​या मेळाव्यास पालकमंत्री शंभूराजे देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, संपर्कप्रमुख शरद कणसे, हरिभाऊ जगदाळे, जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह भोसले आणि युवासेना अध्यक्ष संभाजी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सातारा जिल्ह्याच्या परंपरेचा गौरव करताना शिंदे म्हणाले की, ही क्रांतीकारकांची आणि यशवंतराव चव्हाणांसारख्या उत्तुंग नेतृत्वाची भूमी आहे. या मातीत झालेल्या गलिच्छ राजकारणाला जनता कधीही विसरणार नाही. जिल्हा परिषदेत जे काही घडले, त्यावर सध्या भाष्य करणे टाळत असलो तरी योग्य वेळी शिवसेनेचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे सूचक विधानही त्यांनी केले.

​कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शिंदे यांनी शिवसेना हा सामान्यांचा पक्ष असल्याचे अधोरेखित केले. पक्षात कोणीही मालक किंवा नोकर नसून कार्यकर्त्यांच्या निष्ठेनुसार आणि कुवतीनुसार त्यांना पदे दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळासाठी 'गाव तेथे शिवसेना' ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश देतानाच, कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले. साताऱ्याच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

​यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतील अपयशावर स्पष्टपणे भाष्य केले. बहुमत असतानाही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडता आले नाहीत, ही मोठी खंत असल्याचे सांगत त्यांनी साताऱ्याला पर्यटन हब बनवण्यासाठी विशेष आराखडा तयार असल्याचे नमूद केले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. खरी शिवसेना कोणती असा प्रश्न उपस्थित करणारे आता हळूहळू राजकारणातून संपुष्टात येत असल्याचा टोला त्यांनी लगावला. याचसोबत साताऱ्यात आयटी पार्क आणि फलटण येथे ग्रामीण एमआयडीसी प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्याची घोषणा त्यांनी केली.

​या मेळाव्यादरम्यान विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. निलेश मोरे यांनी आपला राजीनामा मागे घेऊन पुन्हा शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. या मोठ्या मेळाव्यामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी दिलेल्या इशाऱ्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य उपक्रम
पुढील बातमी
राजकारण्यांच्या ‘डर्टी गेम’मध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा बळी; प्रशासकीय वर्तुळात दहशतीचे वातावरण

संबंधित बातम्या