शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा - ना. शिवेंद्रसिंहराजे; कुमठे येथे महाराजस्व अभियानांतर्गत लाभार्थ्यांना साहित्य, दाखले वाटप

by Team Satara Today | published on : 20 April 2026


सातारा  : राज्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी, विविध सोयी- सुविधा पुरवण्यासाठी सरकारने अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. अशा योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून त्याचा लाभ थेट जनते पर्यंत पोहचवण्याचे काम प्रशासनाने काटेकोरपणे करावे आणि जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याचे काम करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 

कुमठे ता. सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत लाभार्थ्यांना शासनाच्या विविध विभागातील लाभांचे, साहित्याचे व दाखल्यांचे वाटप ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्य पूजा मोरे, सातारा पंचायत समितीचे सभापती महेश गाडे, सदस्या प्रमिला सुतार, कोमल दळवी, सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, अरुण कापसे, सुरेंद्र देशपांडे, अरविंद चव्हाण, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नामदेव सावंत, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव, भूमी अभिलेखचे उप अधीक्षक तुषार पाटील, कृषी विभागाचे ढगे आदी मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी आष्टे येथील पुनर्वसीत गावठाणातील भूखंड भूधारण प्रकार वर्ग २ चे वर्ग १ करून १०५ लाभार्थ्यांना ७/१२ व फारफार वाटप, कातकरी दाखले ५१, संजय गांधी निराधार योजना १५ लाभार्थी, श्रावण बाळ योजना १०, अपाक कमी करणे ९, लक्ष्मी मुक्ती योजना २, वारसनोंदी ५६, एकुम कमी करणे ५, ७/१२ दुरुस्ती ७, डिजिटल रेशनकार्ड वाटप २४०, शाळकरी मुलांचे अधिवास प्रमाणपत्र ४०५, बोजा कमी करणे ५, आरोग्य तपासणी ६०, नेत्र तपासणी ११९, कृषी विभाग अंतर्गत ट्रॅक्टर व अवजार वाटप २६, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती ४७, एस टी महामंडळाच्या महिला सन्मान योजनेंतर्गत बस पासेस वाटप १४२, रक्तदान शिबीर १५, एकात्मिक बालविकास अंतर्गत बेबी केअर किट वाटप ३५, कॅनरा बँक सीएसआर फंडातून सायकल वाटप १२, भूमी अभिलेख विभाग १५, पशु वैद्यकीय विभाग अंतर्गत जंतू नाशक गोळ्या वाटप ५६, जिल्हा मध्यवर्ती बँक १० तर वन विभागाशी संबंधित ४ लाभार्थ्यांना याप्रसंगी लाभ देण्यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवसेनेतील वाद निवळला; शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे यांचा राजीनामा मागे
पुढील बातमी
जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमिक मुक्ती दलाचे आंदोलन; प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

संबंधित बातम्या