शोषित घटकांसाठी काम करणाऱ्या दलित महासंघाचे कार्य उल्लेखनीय - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव; प्रबोधन मेळावा उत्साहात

by Team Satara Today | published on : 20 April 2026


सातारा  : उपेक्षित, वंचित, दलित, शोषित घटकांसाठी काम करणारी दलित महासंघासारखी संस्था त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. त्यांच्या हितासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव यांनी काढले.

दलित महासंघ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कृती समितीच्यावतीने आयोजित प्रबोधन मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष कदम, भुलतज्ञ डॉ. रामचंद्र जाधव, नेत्ररोगतज्ञ डॉ. चंद्रकांत काटकर, बालरोगतज्ञ डॉ. उल्का झेंडे, स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुधीर कदम, दंतचिकित्सक डॉ. सुजय सकट, डॉ. अनुराधा सकट, पत्रकार अजित जगताप  तसेच जिल्हा रुग्णालयाचे सहाय्यक अधीक्षक श्रीनिवास जोशी यांचा सन्मान करण्यात आला.

दरम्यान, रिपाइं (आठवले गट) मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ गालफाडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी दिलेल्या लढ्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, दलित महासंघ ही केवळ एका समाजापुरती मर्यादित संघटना नसून सर्व समाजातील उपेक्षित व वंचित घटकांसाठी न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे.

किशोर गालफाडे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी २०२३ पासून पाठपुरावा सुरू असून त्यास यश आले आहे. १ मे नंतर राज्याचे बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रराजे यांची वेळ मिळाल्यानंतर लवकरच स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे स्वागत डॉ. रमाकांत साठे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनिषा चव्हाण, मंगेश चव्हाण, पूजा घाडगे, विमल शिंदे, मीना अडागळे, सविता कणसे, आशिकी गुंजाळ, रिना भोसले, अरुणा भोसले, रुपिता पवार, मनिषा माने, सुभाष गुंजाळ, वैभव गवळी, महेंद्र वायदंडे, सचिन मोरे आदींनी परिश्रम घेतले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सहकारी संस्थांनी उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करावेत : गृहनिर्माण पुनविकास प्राधिकरण अध्यक्ष प्रवीण दरेकर; जिल्हा बँकेत 'सहकार चळवळीसमोरील आव्हाने व उपाययोजना' विषयावर चर्चासत्र
पुढील बातमी
एसपी तुषार दोशी यांची सांगलीला बदली; निखील पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक

संबंधित बातम्या