सातारा : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग कडून इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातील मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्यात आल्याने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात सर्वपक्षीय बैठक पार पडली असून, संबंधित निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी शुक्रवारी (दि. २४ एप्रिल रोजी) मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती छत्रपती वृषालीराजे यांनी पत्रकार परिषेदत दिली.
छत्रपती वृषालीराजे म्हमाल्या, अभ्यासक्रमातील नकाशावर सुरुवातीला काही आक्षेप घेतल्यानंतर संबंधितांनी त्यात बदल केले होते. मात्र, त्यानंतरही वाद कायम राहिल्याने अखेरीस संपूर्ण नकाशाच वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा विषय केवळ नकाशापुरता मर्यादित नसून, इतिहासाच्या अचूकतेशी व शैक्षणिक प्रामाणिकतेशी संबंधित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
इतिहासातील उपलब्ध पुरावे आणि नोंदींनुसार मराठा साम्राज्याचा विस्तार उत्तर भारतापर्यंत झाला होता. दिल्लीपासून पुढे अटकपर्यंत मराठ्यांचा प्रभाव पोहोचल्याचे उल्लेख विविध दस्तऐवजांत आढळतात. तसेच राजस्थानमधील मोहिमा व राजकीय हस्तक्षेप याबाबतही स्पष्ट नोंदी आहेत. यासंदर्भात द राजपुताना गॅझेटर पार्ट - १ यांसारख्या अधिकृत दस्तऐवजांमध्ये मराठा सत्तेचा प्रभाव नमूद करण्यात आला आहे. या ऐतिहासिक वास्तवाचे प्रतिनिधित्व करणारा नकाशा अभ्यासक्रमातून वगळल्यास विद्यार्थ्यांपर्यंत अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी जोर धरत आहे.
सातारा येथे झालेल्या बैठकीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी एकत्रित भूमिका घेण्याची गरज अधोरेखित केली. या विषयाला समाजातील विविध स्तरांतून वाढता प्रतिसाद मिळत असून संबंधितांच्या या निर्णयाच्या निषेधार्थ साताऱ्यात शुक्रवारी (दि. २४ एप्रिल रोजी) सकाळी १० वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाची सुरुवात शिवतीर्थ, पोवई नाका येथून होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. हा मोर्चा सर्वपक्षीय, सर्व जाती-धर्मीय व सर्व समाजघटकांच्या सहभागातून काढण्यात येणार असून, इतिहासाच्या सन्मानासाठी आणि अचूक माहितीच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आला आहे, असे छत्रपती वृषालीराजे यांनी सांगितले.
मराठा साम्राज्याचा विस्तार नकाशा वगळल्याच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणाऱ्या शुक्रवारच्या मोर्चात खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह विविध मान्यवर, विविध राजकीय पक्ष, संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत. राजघराण्यातील आम्ही सर्व मंडळी संबंधितांच्या या निर्णयाविरोधात आवाज उठविणार असून प्रसंगी कायदेशीर लढाई लढण्याचीही आमची तयारी असल्याचे छ. वृषालीराजे यांनी सांगितले.