सातारा : सोनोग्राफी सेंटर, गर्भपात केंद्र आणि कुटुंब नियोजन केंद्राच्या परवान्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नावाने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा रुग्णालयातील शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. आनंदा गोपाळ वाळवेकर (वय ५८, रा. सोनगाव, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, या कारवाईमुळे जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराचा बुरखा टराटरा फाटला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या नावाचा उल्लेख असल्याने वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, तक्रारदार यांचे भागीदारीमध्ये हॉस्पिटल असून त्यामध्ये सोनोग्राफी, शासकीय गर्भपात केंद्र आणि कुटुंब नियोजन सुविधा सुरू करण्यासाठी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी तक्रारदार हे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनातील शिपाई आनंदा वाळवेकर याला वारंवार भेटत होते. यावेळी डॉ. युवराज करपे यांच्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. याप्रकरणी ९ मार्च २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची अत्यंत गांभीर्याने दखल घेत ९ मार्च ते १५ एप्रिल या दरम्यान तब्बल सात टप्प्यांत कसून पडताळणी केली. १६ मार्च रोजी झालेल्या निर्णायक पडताळणीत, शिपाई आनंदा वाळवेकर याने तक्रारदाराच्या केंद्राच्या परवान्यासाठी डॉ. करपे यांच्याकरिता पंचांसमक्ष ५० हजार रुपये स्वीकारले. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या अँटी करप्शनच्या पथकाने वाळवेकर याला ताब्यात घेऊन अटक केली.
डॉ. युवराज करपे यांच्यावर यापूर्वीच आरोग्य उपसंचालकांनी कारवाई केली असून त्यांची सेवा कोल्हापूर उपसंचालक कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. आता लाचखोरीच्या प्रकरणात थेट नाव समोर आल्याने डॉ. करपे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी आनंदा वाळवेकर याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या या धडक कारवाईने सातारा जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये असलेल्या 'एजंट' प्रवृत्तीचे धाबे दणाणले आहेत.