कोरेगाव : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने 14 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आलेली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परीक्षेत कोरेगाव येथील अमेय राजेंद्र साळुंखे याने देशात 34 वा क्रमांक पटकावला आहे.
येथील शेतकरी राजेंद्र व गीता साळुंखे यांचा मुलगा असलेल्या अमेयचे पूर्व प्राथमिक ते प्राथमिक (चौथीपर्यंत) शिक्षण येथील कांतीलाल विरचंद भंडारी प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक (इयत्ता पाचवी) शिक्षण येथील सरस्वती विद्यालयात झाले. त्यानंतर सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण खावली (ता. सातारा) येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले. नवोदय विद्यालयात इयत्ता दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर अमेयने पुणे (कात्रज) येथील यशोतेज अकॅडमीत इयत्ता अकरावीसाठी प्रवेश घेतला. बारावीत शिक्षण घेताना अमेयने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने गेल्या वर्षी झालेली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी परीक्षा 2026 दिली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यातील मुलांच्या गुणवत्ता यादीत अमेय याने 34 वा क्रमांक पटकावला आहे.
एनडीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल अमेय याचे आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रियाताई शिंदे, खटाव पंचायत समितीचे सदस्य गौरव जाधव, कोरेगावच्या नगराध्यक्ष दिपालीताई बर्गे, उपनगराध्यक्ष राहूल रघुनाथ बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, डी. पी. भोसले कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल. डी. कदम, मॉडर्न इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक डी. एम. साळुंखे, सर्व आजी- माजी नगरसेवक, नागरिकांनी अभिनंदन केले.