सातारा : जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. मंगळवार, दि. १४ एप्रिल रोजी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या पोवई नाका येथील ‘कोयना दौलत’ निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
संस्थेच्या निवेदनात विविध मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामाणिक व पारदर्शक अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंडे यांची बदली रद्द करावी, आमदार निधी व इतर खर्चांचा तपशील सार्वजनिक करावा, तसेच दिव्यांगांसाठी राखीव निधीच्या वापरात पारदर्शकता आणावी, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
याशिवाय, शाळांकडून फी वसुलीच्या नावाखाली दिव्यांग विद्यार्थ्यांना होणारा त्रास थांबवावा, दिव्यांगांसाठी प्रलंबित असलेले जागा वाटप प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. एसटी स्थानकांवर दिव्यांगांना प्राधान्य दिले जात नसल्याची तक्रार करत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
तसेच, शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्प, व्हीलचेअर यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अनेकदा निवेदने देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप संस्थेने केला आहे. यामुळेच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.