सातारा : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर (खेड) येथील शासकीय विश्रामगृहाच्या जागेवर कथित अनधिकृत बांधकाम झाल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित ठिकाणी उभारण्यात आलेला दर्गा हटवून जागा तात्काळ मोकळी करावी, अशी मागणी शिवशंकर राजेंद्र स्वामी यांनी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तक्रारीनुसार, संबंधित जागेवर पूर्वी कोणतेही प्रार्थनास्थळ नव्हते. मात्र, गेल्या काही वर्षांत त्या ठिकाणी बांधकाम करून धार्मिक स्वरूपाचे स्थळ उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. शासकीय विश्रामगृह परिसरात कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नसताना येथे लोक एकत्र येत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच, या बांधकामाची अधिकृत नोंद महसूल नोंदी (७/१२) मध्ये नसल्याचे नमूद करत, हे अतिक्रमण असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित जागा तात्काळ मोकळी करून ती शासनाच्या ताब्यात घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे २ एप्रिल २०२६ रोजी लेखी तक्रार देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने तक्रारदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनासमोर कायदेशीर तसेच सामाजिक समतोल राखण्याचे आव्हान उभे राहिले आहे. परिस्थिती चिघळू नये यासाठी प्रशासनाने सर्व बाजूंची पडताळणी करून योग्य ती कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.