मुंबई: भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आणि कोट्यवधी रसिकांच्या हृदयावर आपल्या स्वरांनी राज्य करणाऱ्या गानसम्राज्ञी आशा भोसले यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या धाकट्या भगिनी असलेल्या आशाताईंच्या जाण्याने संगीतसृष्टीतील एक सोनेरी पान निखळले असून संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आशा भोसले यांना श्वसनविकार (चेस्ट इन्फेक्शन) आणि शारीरिक अशक्तपणामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची नात जनाई भोसले हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देत चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांची प्राणज्योत मालवली. आशाताईंचे पुत्र आनंद भोसले यांनी अत्यंत जड अंतःकरणाने त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
आशा भोसले यांचे पार्थिव उद्या, सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघणार असून सायंकाळी ४ वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. या पार्श्वभूमीवर ब्रीच कँडी रुग्णालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सुमारे सहा दशकांहून अधिक काळ आपल्या अष्टपैलू आवाजाने चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या आशाताईंनी हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ आणि तेलगू अशा अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. १९५० च्या दशकात कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर त्यांनी ओ. पी. नैय्यर, सचिन देव बर्मन, आर. डी. बर्मन आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांसारख्या दिग्गज संगीतकारांसोबत काम करत अनेक अजरामर गीते दिली. 'पिया तू अब तो आजा', 'दम मारो दम', 'इन आंखों की मस्ती' यांसारख्या गाण्यांमधून त्यांनी शास्त्रीय संगीतापासून ते पॉप आणि कॅबरेपर्यंत सर्वच प्रकारांत आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना 'पद्मविभूषण' आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका अष्टपैलू पर्वाचा अंत झाला आहे.