पत्नीवरील संशयातून पोटच्या मुलाची बापाकडूनच हत्या

by Team Satara Today | published on : 12 April 2026


कराड : वडोली भिकेश्वर परिसरातील कृष्णा नदीच्या पात्रात काही दिवसांपूर्वी एका अज्ञात बालकाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना मसूर पोलिसांनी एका धक्कादायक सत्याचा उलगडा केला असून, अवघ्या सहा वर्षांच्या मुलाची त्याच्या वडिलांनीच निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या अमानुष कृत्यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

​सिद्धार्थ मल्लिकार्जुन आरकेरी (वय ६, रा. नागठाणे, ता. विजापूर, कर्नाटक) असे मृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी वडील मल्लिकार्जुन आरकेरी याला ताब्यात घेतले असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. हा मुलगा आपला नाही, या संशयातून आणि मित्रांकडून होणाऱ्या सततच्या टोमणेबाजीमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

​मल्लिकार्जुन याने १६ मार्च रोजी मुलाला निवासी शाळेत प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर नेले. वडोली भिकेश्वर परिसराची त्याला पूर्वीपासून माहिती असल्याने, त्याने सिद्धार्थला या निर्जन ठिकाणी आणले. आजूबाजूला कोणीही नसल्याची खात्री करून त्याने स्वतःच्या मुलाला निर्दयीपणे कृष्णा नदीच्या पात्रात ढकलून दिले आणि तिथून पळ काढला. दरम्यान, पत्नीने कर्नाटक पोलिसांत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर या तपासाला वेग आला.

​१८ मार्च रोजी नदीपात्रात मुलाचा मृतदेह मिळाल्यानंतर त्याची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, मसूर पोलिसांनी तांत्रिक तपासाचा आधार घेत आणि कन्नड भाषेतून माहिती प्रसारित करत या प्रकरणाचा छडा लावला. अखेर केवळ संशयामुळे एका निरागस बालकाचा बळी गेल्याचे या तपासातून स्पष्ट झाले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सह्याद्री एक्सप्रेसवर शेणोली स्थानकाजवळ दरोडा; सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांची लूट
पुढील बातमी
संगीतविश्वातील अष्टपैलू स्वरांचा अंत: गानसम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन

संबंधित बातम्या