साताऱ्याचा पारा ४० पार जाण्याची शक्यता; पुढील आठवड्यात ४१ अंशांच्या ‘हिटवेव्ह’चा इशारा

by Team Satara Today | published on : 12 April 2026


सातारा : डोंगरांच्या कुशीत वसलेले सातारा शहर एरवी कडक उन्हाळ्यातही फारसे तापत नाही, मात्र यावर्षी जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली असून उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने उन्हाचा चटका हैराण करत आहे. या वाढत्या उष्णतेचा परिणाम आता नागरिकांच्या आरोग्यावरही होऊ लागला आहे. उष्म्यापासून दिलासा मिळवण्यासाठी बाजारपेठेत शीतपेये आणि रसरशीत फळांना मागणी वाढली असून, नागरिक डोक्यावर टोपी आणि तोंडाला रुमाल बांधून प्रवास करताना दिसत आहेत.

वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून, त्यापासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजनांचे आवाहन करण्यात येत आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात सातार्‍यात उष्णतेची लाट आली होती, तेव्हा तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. यावर्षीही एप्रिल संपायला अजून १८ दिवस शिल्लक असतानाच शनिवारी तापमान ३७ अंशांवर पोहोचल्याने पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर तापमानात सातत्याने वाढ होणार असून, हा पारा ३९ ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची भीती आहे. त्यानंतर मे महिना सुरू होणार असल्याने आरोग्याची विशेष काळजी घेणे आता आवश्यक बनले आहे.

कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असून शरीरातील पाण्याची पातळी कमी होत आहे. ही पातळी टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याबरोबरच लिंबू, कोकम आणि इतर सरबते घेण्यावर नागरिक भर देत आहेत. बाजारपेठेत कलिंगड, द्राक्ष, टरबूज, संत्री, मोसंबी आणि पपई यांसारख्या रसरशीत फळांची आवक वाढली असून, दरात चढ-उतार असूनही ग्राहक या फळांना पसंती देत आहेत. दुपारच्या वेळी, म्हणजेच १२ ते ५ या काळात कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

दिवसभर उन्हाचे चटके सोसावे लागत असले तरी सूर्यास्तानंतर मात्र सातारकरांना काहीसा दिलासा मिळत आहे. रात्रीच्या वेळी तापमानात मोठी घट होत असून, ३८ अंशांवर असणारा पारा थेट २४ अंशांपर्यंत खाली येतो. रात्रीच्या या सुखद वातावरणामुळे नागरिकांना एसीची फारशी गरज भासत नाही. सायंकाळच्या वेळी गारव्याचा आनंद घेण्यासाठी अनेक जण यवतेश्वर आणि कास पठाराकडे धाव घेत असून, तिथे महाबळेश्वरसारख्या थंड हवेचा आस्वाद घेत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जादूटोणा व अंधश्रद्धेच्या नावाखाली होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले; पती, सासू व सासऱ्यांविरुद्ध गुन्हा
पुढील बातमी
सह्याद्री एक्सप्रेसवर शेणोली स्थानकाजवळ दरोडा; सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांची लूट

संबंधित बातम्या