सातारा : संबोधी प्रतिष्ठांच्या वतीने प्रसिद्ध साहित्यिक,कथाकार सुधाकर यशवंत बोरगावकर स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार स्पर्धेत कविता पाचंग्रे-खरात ( शिरुर, पुणे ),सुनील साळुंके ( डोंबिवली,मुंबई), गोपाल शिरपूरकर (चंद्रपूर) यांचे कथासंग्रह अनुक्रमे पहिले तीन क्रमांकाने विजेते व अलका मोकाशी (नागपूर), महेश सोवनी ( भिवंडी,ठाणे ) यांना उल्लेखनीय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत , अशी माहिती संबोधी प्रतिष्ठानचे संघटक दिनकर झिंब्रे व अध्यक्ष रमेश इंजे यांनी दिली.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने कथाकारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सन २०२५ मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या कथासंग्रहासाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती. संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व विभागातून त्यास मोठा प्रतिसाद लाभला . ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद मनोहर कोपर्डे ( सातारा ) व व्यासंगी अभ्यासक, समीक्षक डॉ.गजानन अपिने ( पुणे ) यांच्या निवड समितीने परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी जाहीर केलेला कथासंग्रह स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे - प्रथम क्रमांक - ' तो स्पर्श ' - कविता पाचंग्रे - खरात ( शिरुर - पुणे ), द्वितीय क्रमांक - ' तू ही गोष्ट सांगायला नको होती! ' - सुनील साळुंके ( डोंबिवली, मुंबई ), तृतीय क्रमांक - ' भुईकोर ' - गोपाल शिरपूरकर (वडगाव,चंद्रपूर ) उत्तेजनार्थ -' सारीपाट ' - अलका मोकाशी ( नागपूर ) व ' कडेवर आणि इतर कथा '- महेश सोवनी ( भिवंडी, ठाणे).
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने उल्लेखनीय विशेष गौरव सुधाकर बोरगावकर यांचे भाव विश्व प्रतिबिंबित करणारे कथाकार प्रदीपकुमार कांबळे -बहेकर ( पुणे ) यांच्या ' कृष्णामाई ' या कथासंग्रहाचा करण्यात येणार आहे.
हे पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते व निवड समितीचे मान्यवर साहित्यिक समीक्षक यांच्या उपस्थितीत रविवार, दि. २६ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता सातारा राजवाडा बस स्थानक समोरच्या छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगरवाचनालयाच्या पाठक हॉल मध्ये होणाऱ्या विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहेत. या समारंभात उपस्थित रहावे असे आवाहन, संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा. प्रशांत साळवे, कार्यवाह हौसेराव धुमाळ, सहकार्यवाह डॉ.सुवर्णा यादव, कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे,विश्वस्त अनिल बनसोडे, केशवराव कदम, अशोक कांबळे, प्रकाश गायकवाड,अशोक भोसले व डॉ. जयपाल सावंत यांनी केले आहे.