थकीत मानधन, वाढता आर्थिक ताण आणि कामगारविरोधी धोरणांविरोधात आशा सेविकांचा झेडपीसमोर एल्गार

by Team Satara Today | published on : 02 April 2026


सातारा  : सहा महिन्यांपासून थकीत मानधन, वाढता आर्थिक ताण आणि कामगारविरोधी धोरणांविरोधात आज बुधवारी साताऱ्यात आशा आरोग्य सेविकांनी संतप्त आंदोलन छेडले. आशा वर्कर्स युनियनच्या वतीने बुधवार, १ एप्रिल २०२६ रोजी जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने करत ''काळा दिवस'' पाळण्यात आला. घोषणांनी परिसर दणाणून सोडत आशा सेविकांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी ठाम भूमिका घेतली.

या आंदोलनामागील मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारकडून गेल्या सहा महिन्यांपासून आशांचे मानधन थकीत ठेवण्यात आले आहे. यामुळे अनेक आशा सेविकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असून त्यांच्या कुटुंबीयांवरही आर्थिक संकट ओढवले आहे. तसेच कामगारविरोधी संहितांच्या निषेधार्थ देशभरात आज हा काळा दिवस पाळण्यात येत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनादरम्यान आशा सेविकांनी जोरदार घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे: केंद्र सरकारने थकीत असलेले सहा महिन्यांचे मानधन तात्काळ द्यावे, दर महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत नियमित मानधन अदा करावे, वेतन चिठ्ठी देण्यात यावी, विनामोबदला कामे देऊ नयेत, दिवसभर ठराविक भागात थांबण्याची सक्ती करू नये, विविध कारणांवरून मोबदल्यात कपात करू नये, तसेच आभा कार्ड, दिव्यांग सर्वे, वयोश्री योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना यांची थकित बिले त्वरित द्यावीत. याशिवाय आशा सेविकांना भविष्य निर्वाह निधी योजना लागू करावी, मंजूर मोबाईल भत्ता ३०० रुपये तात्काळ अदा करावा, निवृत्ती वय ६५ वर्षे करावे आणि केंद्र सरकारने जाहीर केलेली १५०० रुपयांची मानधनवाढ त्वरित लागू करावी, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनात कॉम्रेड आनंदी अवघडे, रूपाली पवार, राणी कुंभार, प्रतिभा बनसोडे, दिपाली जाधव, अमिता सरतापे, विद्या कांबळे, शीला साळुंखे, निर्मला रिटे, आशा बोराटे, सुप्रिया कांबळे यांच्यासह अनेक आशा सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पुन्हा घेण्यात यावी; राष्ट्रवादी- शिवसेनेची विभागीय आयुक्तांकडे याचिका
पुढील बातमी
साउंड सिस्टीमवरून वाद; टोळक्यांनी दोघांवर केला चाकू हल्ला; १२ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

संबंधित बातम्या