कराडातील मतदार यादीही सदोष

by Team Satara Today | published on : 16 August 2025


  • कराड : परगावातील, परजिल्ह्यातील तसेच शहर भागातील दुसर्‍या पेठेतील मतदारांची नावे कराड दक्षिण मतदार संघांतर्गत असणार्‍या कराड शहरातील मतदार यादीत समाविष्ठ झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील व अजय उंडाळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

  • निवेदनात म्हटले आहे की, चुकीच्या भागात नोंद झालेली नावे त्याठिकाणहून वगळून योग्य त्या ठिकाणी नोंद व्हावीत जेणेकरून त्याही लोकांचा मतदान हक्क अबाधित राहील. तसेच काही स्थलांतरीत मतदारांसह दुबार व मयत मतदारांची नावे देखील संबंधित यादीत आहेत, याबाबत देखील योग्य तो बदल व्हावा. ऑनलाइन नोंदणीमुळे चेकलिस्टला पडणारी नावे चेक करून त्यानंतर नावे संबंधित लिस्टमध्ये समाविष्ट करावी. बाहेरील नावे अजूनही मतदार यादीमध्ये नोंद होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

  • संबंधित मतदार यादीत 30 ऑक्टोबर 2006 पूर्वी जन्म झालेल्यांची नावे नोंद होताना दिसत आहेत. मात्र 1 नोव्हेंबर नंतर जन्म झालेल्यांची नावे या यादीत नोंद होत नाहीत. तसेच 18 वर्षे पूर्ण झालेल्यांची नावे देखील या मतदार यादीत नोंद होत नाहीत, याकडे लक्ष देऊन प्रशासनाने यावर तोडगा काढावा अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान सदर मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांना देण्यात आले आहे. मतदार यादीत अनेक त्रुटी आहेत. बाहेरील मतदारांची नावे कराड शहरात लागली आहेत. याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कवठेत महाराजस्व अभियानांतर्गत शेतरस्ता खुला
पुढील बातमी
पालकमंत्री कार्यालयाचे स्वातंत्र्य सैनिक व भारतीय लष्करातील माजी सैनिकांच्या हस्ते उद्घाटन

संबंधित बातम्या