सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोल नाक्यापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पाटबंधारे वसाहत ते रायगाव फाट्यादरम्यान पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळो धोकादायक प्रवास करावा लागत आहे. येथील सेवा रस्त्यावर लूटमारीचे प्रकारही घडू लागले आहेत.
सहापदरीकरण काम करताना लगतच्या गावातील ग्रामस्थांना विश्वासात न घेता संबंधित कंपनीने केलेल्या कामाचा त्रास प्रवाशांना व स्थानिकांना होत आहे. टोल नाक्यापासून जवळच असणाऱ्या रायगाव फाट्यावर अनेक छोटे-मोठे उद्योग सुरू आहेत. अनेक कंपन्याही येथे नुकत्याच सुरू झाल्या आहेत. आजूबाजूच्या परिसरातील महिलांना येथे रोजगार उपलब्ध झाला आहे. हॉटेल, कापड, किराणा, पेट्रोलपंप, वीटभट्टी, दूध, पोल्ट्री, स्टील, सिमेंट,महिला उद्योग, फर्निचर असे अनेक व्यवसाय या ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिवस रात्र वर्दळ असते. फाट्यावर बस थांबाही आहे. मात्र, रात्रीच्या वेळी येथे पथदिवे नसल्याने कायम अंधार असतो. महिलांसह इतर प्रवास करणाऱ्या लोकांना त्यामुळे भीतीदायक प्रवास करावा लागतो. अनेकदा येथे परिसरातील शेतकरी, महिला, दुचाकी चालकांना अडवून लूटमारीचे प्रकार घडले आहेत. तरीही या ठिकाणी महामार्गाच्या सहापदरीकरणापासून येथील अडचणी आजही जैसे थे आहेत.
येथील ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांनाही यासंबंधी अनेकदा निवेदन दिली आहेत. मात्र, या निवेदनाला अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. नियोजन न करता केलेले काम येथील प्रवास करणाऱ्या व आजूबाजूच्या नागरिक, महिलांना धोकादायक ठरत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला बस थांबे असून, पहाटे येथे शाळा, कॉलेजला जाणारे विद्यार्थी, नोकरदारांना अंधारात थांबावे लागते. काही वेळा बस देखील येथे थांबत नसल्याने रात्रीच्या वेळी येथे उतरणे धोक्याचे ठरत आहे, या ठिकाणी त्वरित पथदिवे बसवणे गरजेचे आहे.